दीपश्रीने 44 जणांना घातला 3.88 कोटीचा गंडा
पैसे गोळा करुन आपणच दीपश्रीला दिले : दीपश्रीकडून आरोग्यमंत्र्यांच्या नावाचा वापर,‘मिडल मॅन’ संदीप जगन्नाथ परबचा गौप्यस्फोट
फोंडा : बेरोजगारांना सरकारी नोकरीचे आमिष दाखवून लाखो रूपयांना गंडा घालणाऱ्या दीपश्री सावंत गावस प्रकरणात माशेल येथील मध्यस्थाने दीपश्री सावंत गावस हिला आपल्याकडून 3.88 कोटी रूपये पोहोचल्याची तक्रार दाखल केल्यामुळे आता या प्रकरणाने वेगळेच वळण घेतले आहे. जॉब स्कॅमसाठी नेटवर्कद्वारे दीपश्री आणि बेरोजगारांच्या माळेतील ‘मिडल मॅन’ म्हणून वावरणारा तारीवाडा - माशेल येथील संदीप जगन्नाथ परब याने गौप्यस्फोट केल्यानंतर आता दीपश्रीने तब्बल 44 जणांना सुमारे 3.88 कोटी रूपयांना गंडविल्याचा ताजा प्रकार उघडकीस आला आहे.
दीपश्रीच्या जॉब स्कॅम प्रकरणात मध्यस्थ म्हणून वावरणाऱ्या संदीप परब याने काल गुरुवारी मुख्य संशयित दीपश्रीविरोधात म्हार्दोळ पोलिसस्थानकात तक्रार नोंदवून आपण माफिचा साक्षीदार बनण्याकडे वाटचाल करीत पोलिसांनाच चेकमेट केले आहे. सरकारी नोकरीचे आमिष दाखवून 44 बेरोजगारांना सुमारे 3 कोटी 88 लाख रूपयांना गंडा घातल्याचे संदीप परबचे म्हणणे आहे. काल गुरूवारी दुपारी याबाबत लेखी तक्रार संदीप जगन्नाथ परब याने दाखल केली आहे.
दीपश्रीला आपणच पैसे गोळा करुन दिले
नोव्हेंबर 2023 ते एप्रिल 2024 या कार्यकाळात आरोग्यमंत्र्याचे नाव वापरून वनखाते, नगरनियोजन खाते (टीसीपी) व आरोग्य खात्यात सरकारी नोकरभरती करण्यात येणार असल्याचे आश्वासन दीपश्रीकडून देण्यात आले होते. लोकसभा निवडणुकीच्या आचासंहितेसाठी नोकरभरती प्रक्रियेला विलंब झाल्याचे कारण देत दीपश्रीने मध्यस्थाला म्हणजे संदीप जगन्नाथ परब याला लटकवत ठेवले होते. संदीपने सरकारी नोकरीसाठी ओळखीच्याकडून पैसे घेतलेल्यांची यादीही म्हार्दोळ पोलिसात दिली असून ती सर्व रक्कम दीपश्रीला आपण दिल्याचेही तक्रारीत नमूद केले आहे.
संदीप परबच्या मुलीला नोकरीचे आमिष
ठकसेन दीपश्रीने संदीप परब हिच्या मुलीला टीसीपी खात्यात ड्राफ्टमन म्हणून रूजू करण्यासाठी सुमारे 8 लाखांची मागणी केली होती. त्यातील 3 लाख रूपये ‘टोकन मनी’ म्हणून दीपश्रीला देण्यात आले होते. यातील 1 लाख 80 हजार रूपये गुगल पे अॅपद्वारे पाठविण्यात आले होते तर बाकीचे रोख दिले होते. येथून या जॉब स्कॅमचा प्रकार सुरू झाला. ही माळ वाढत गेली. तो आकडा एकूण 44 जणांचे सुमारे 3.88 कोटीच्या घरात पोचला.
आपण ‘मिडल मॅन’ची भूमिका बजावली
या व्यवहारात आपण फक्त ‘मिडल मॅन’ची भूमिका बजावलेली आहे. सरकारी नोकरीसाठी दीपश्रीला देण्यासाठी आपल्याकडे आपल्या नातेवाईक, मित्रांनी दिलेले पैसे परत करण्यासाठी तगादा लावल्यानंतर 80 लाखांची परतफेड आपण स्वत:कडील सोने व इतर मालमत्ता विकून परत केल्याचे संदीप परब यांनी सांगितले.
वैद्यकीय चाचणीसाठी उमेदवारांची बनावट यादी ‘सेम टू सेम’
संदीप परब याच्या पत्नीचे माशेल येथे तयार कपडयाचे दुकान असून तेथेच हा सर्व व्यवहार झाल्याचे स्पष्ट झाले आहे. सरकारी नोकरीसाठी इच्छुकांनी येथे संपर्क साधून पुढील कार्यवाही होत असे. यामध्ये कागदपत्रांची छाननी, वैद्यकीय चाचणीसाठी नावांची यादी ‘सेम टू सेम’ यादी दीपश्रीने पुरविलेली आहे. वैद्यकीय चाचणीची प्रक्रियाही आरोग्यमंत्र्यांकडून उमेदवाराशिवाय करून घेण्यात येईल, असे ठोस आश्वासन दीपश्रीने दिले होते. तिच्यावर विश्वास ठेवून आपण फसलो याची प्रचिती आल्यानंतर तिला संपर्क करण्यात आला. यावेळी तिने सुमारे 25 लाख 50 हजार रूपये परत केल्याची माहिती तक्रारदार संदीप परब यांनी दिली. 4 धनादेश दिले ते बाऊंस झाल्याने हा गंडविल्याचा प्रकार शेवटी उघडकीस आला.
ठकसेन दीपश्री सावंत गावसचा भुलभुलैया....
ठकसेन दीपश्री ही जनतेला गंडा घालून स्वत: मात्र किलोभर दागिने परिधान करून लग्नसमारंभांना वावरत असे. प्रथम आपण स्टेनोग्राफर असल्याचे भासविले होते. त्यानंतर जीपीएससी परीक्षा देऊन गट विकास अधिकारी बढती मिळाल्याचे सांगून पेढे वाटून संदीप परबच्या कुटुंबियांकडे जवळील साधली. त्यानंतर तयार कपडयाच्या दुकानात खरेदी करून मने जिंकली. त्यानंतर सरकारी नोकरीचे आमिष दाखवून ओढले जाळ्यात. नंतर सुरु केले नेटवर्क मार्केटिंगसारखी साखळी. वाईट मार्गाने नोकरी मिळवू पाहणारे जोडत गेले. दीपश्रीकडे पैशांचा ओघ वाढला. त्यानंतर आलिशान कारगाड्यांची रांग, शहरातील अपार्टमेंटमध्ये दोन अलिशान फ्लॅट, अन्य एकाच्या नावावर 1 कोटी रूपयांचा ठुमदार बंगला थाटून ऐशोआरामाचे जीवन व्यथित करण्याच्या नादात अनेक संसार उद0ध्वस्त करणाऱ्या दीपश्रीला न्यायालयाने जामीन मंजूर न करता सखोल चौकशीसाठी पोलिस कोठडीत वाढ करावी, अशी मागणी अॅड. शैलेश गावस यांनी केली आहे.