बंगाल-झारखंडमध्ये ईडीचे छापे
बांगलादेशी घुसखोरीप्रकरणी कारवाई
वृत्तसंस्था/ रांची
ईडीने बांगलादेशी घुसखोरीशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी मंगळवारी पश्चिम बंगाल आणि झारखंडमधील अनेक ठिकाणी छापे टाकले आहेत. दोन्ही राज्यांच्या 15 ठिकाणी छापे टाकत ईडीने महत्त्वपूर्ण दस्तऐवज जप्त केले आहेत.
ईडीने सप्टेंबर महिन्यात पीएमएलए अंतर्गत एक गुन्हा नोंदविला होता. यात झारखंडमध्ये बांगलादेशी महिलांच्या घुसखोरीच्या चौकशीदरम्यान काळ्या धनाचा खुलासा झाला होता. झारखंडमध्ये बांगलादेशींची मोठ्या प्रमाणात घुसखोरी होत असल्याचा आरोप सातत्याने केला जात आहे. या पार्श्वभूमीवर ईडीने केलेल्या कारवाईला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
झारखंडमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात 43 जागांवर बुधवारी मतदान होणार आहे. तर दुसऱ्या टप्प्याच्या अंतर्गत 38 जागांवर 20 नोव्हेंबर रोजी मतदान होईल. या पार्श्वभूमीवर ईडीने केलेली ही कारवाई महत्त्वाची ठरली आहे. जून महिन्यात रांची येथील पोलीस स्थानकात नोंद एफआयआरच्या आधारावर ईडीने तपास सुरू केला होता.
एका बांगलादेशी महिलेच्या तक्रारीवर एफआयआर नोंदविण्यात आला होता. या कामाच्या शोधात ही महिला मध्यस्थांच्या मदतीने भारतात अवैध मार्गाने दाखल झाली होती. या महिलेने 6 महिलांवर आरोप केले आहेत. या महिलंना एका स्थानिक रिजॉर्टवर छापा टाकत अटक करण्यात आली आहे. यातील एका महिलेकडे बनावट आधारकार्डही मिळाले आहे. सलूनमध्ये नोकरी मिळवून देण्याचे प्रलोभन देत पीडित महिलेला आरोपींनी वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडले होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदींसमवेत अनेक भाजप नेत्यांनी झारखंडमधील झामुमो-काँग्रेस सरकारवर घुसखोरांना मदत करण्याचा आरोप केला आहे. या घुसखोरीमुळे आदिवासीबहुल भागांमधील लोकसंख्येचे स्वरुपच बदलल्याचा दावा केला जात आहे.