प. बंगाल-झारखंडमध्ये ईडीचे 44 ठिकाणी छापे
कोळसा घोटाळ्याप्रकरणी 14 कोटी रोख रकमेसह सोन्या-चांदीचे दागिनेही जप्त
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
कोळसा घोटाळाप्रकरणी शुक्रवारपासून सुरू झालेल्या एका मोठ्या कारवाईत ईडीने पश्चिम बंगाल आणि झारखंडमधील 44 ठिकाणी एकाचवेळी छापे टाकले. मनी लाँडरिंग कायद्याअंतर्गत ही कारवाई करण्यात आली. या छाप्यांमध्ये ईडीच्या पथकांनी 14 कोटी रुपयांहून अधिक किमतीची रोख रक्कम, सोने आणि दागिने जप्त केले. याशिवाय, मालमत्ता कागदपत्रे, जमीन खरेदी-विक्री करार कागदपत्रे, डिजिटल उपकरणे आणि अनेक कंपन्यांच्या खातेवह्यांसह अनेक महत्त्वाचे कागदपत्रे जप्त करण्यात आली. ही कागदपत्रे कोळसा सिंडिकेटशी जोडलेली असल्याचे सांगितले जाते.
झारखंडमध्ये ईडीने धनबाद आणि दुमका येथील 20 ठिकाणी छापे टाकले. या धाडसत्राचा संबंध लाल बहादूर सिंग, अनिल गोयल, संजय खेमा, अमर मंडल आणि त्यांच्या सहकाऱ्यांशी असल्याचे सांगितले जाते. पश्चिम बंगालमध्ये, दुर्गापूर, पुरुलिया, हावडा आणि कोलकातासह 24 ठिकाणी छापे टाकण्यात आले. घरे, कार्यालये, कोळसा प्रकल्प आणि बेकायदेशीर टोल संकलन केंद्रांवर छापे टाकण्यात आले. ही ठिकाणे नरेंद्र खडका, कृष्णा मुरारी कायल, युधिष्ठिर घोष, राज किशोर यादव, लोकेश सिंग, चिन्मय मंडल, निरद बरन मंडल आणि इतरांशी जोडलेली असल्याचे सांगितले जाते. संपूर्ण कारवाईत 100 हून अधिक ईडी अधिकारी सहभागी होते. तसेच सुरक्षेसाठी सीआरपीएफ जवानही तैनात करण्यात आले होते.
ईडीचा तपास पश्चिम बंगाल आणि झारखंड पोलिसांनी बेकायदेशीर कोळसा खाणकाम आणि तस्करीच्या प्रकरणांमध्ये दाखल केलेल्या अनेक एफआयआरवर आधारित आहे. तपासात एक मोठे नेटवर्क कोळसा छुप्या पद्धतीने कोणत्याही वैध कागदपत्रांशिवाय झारखंडहून बंगालला पाठवत असल्याचे आढळून आले होते. छापेमारीदरम्यान जप्त केलेल्या नोंदी आणि कागदपत्रांमधून या आरोपांना पुष्टी मिळाली आहे.
ईडीने छापेमारीदरम्यान डायरी आणि रजिस्टर देखील जप्त केले असून त्यात बेकायदेशीरपणे गोळा केलेल्या पैशाचे आणि त्याच्या वितरणाच्या तपशीलवार नोंदीही आढळल्या आहेत. या नोंदींमुळे या सिंडिकेटला स्थानिक पातळीवरून पाठिंबा मिळत असल्याचे स्पष्ट होत आहे. पश्चिम बंगालमधील तीन प्रकल्पांमध्ये अंदाजे 7.9 लाख मेट्रिक टन कोळसा आणि कोळशाचे पदार्थ आढळून आले. हा साठा बेकायदेशीरपणे केला जात असल्याचे मानले जाते. याप्रकरणी ईडीकडून पुढील तपास सुरू आहे.