20 लाखांची लाच घेताना ईडी अधिकाऱ्याला अटक
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
तामिळनाडूतील दिंडीगुल येथे एका डॉक्टरकडून 20 लाख रूपयांची लाच घेताना अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) अधिकाऱ्याला रंगेहाथ पकडण्यात आले आहे. शुक्रवार, 1 डिसेंबरला स्थानिक पोलिसांच्या हवाल्याने ही माहिती देण्यात आली. अंकित तिवारी असे आरोपी ईडी अधिकाऱ्याचे नाव आहे. अंकित तिवारी आपल्या ईडी अधिकाऱ्यांच्या टीमसोबत अनेक लोकांना धमकावत असत. तसेच अंमलबजावणी संचालनालयातील प्रकरण बंद करण्याच्या नावाखाली लाच घेत असल्याचे स्पष्ट झाले आहे. स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डीव्हीएसी (दक्षता आणि लाचलुचपत प्रतिबंधक संचालनालय) अधिकाऱ्यांनी तिवारीला दिंडीगुलमध्ये 20 लाख ऊपयांच्या रोकडसह पकडले. या प्रकरणाची अधिक चौकशी सुरू आहे. अवैध संपत्तीप्रकरणी कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यावरच लाचखोरीच्या आरोपात अटक झाल्याची अलिकडच्या काळातील ही दुसरी मोठी कारवाई आहे.