नोकरी घोटाळ्याचा ईडीकडून तपास सुरू
सर्व पोलिसस्थानकांतून मिळविल्या फाईल्स : आतापर्यंत 33 तक्रारी, महिलांचा अधिक भरणा
पणजी : अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) गोव्यातील कथित नोकऱ्यांच्या घोटाळ्या संदर्भात मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याच्या (पीएमएलए) अंतर्गत तपास सुरू केला आहे. नोकरी घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी ईडीने गोवा पोलिसांकडून विविध पोलिसस्थानकांत नोंद झालेल्या गुह्यांसंदर्भात माहिती मागवली आहे. गोवा पोलिसांनी नोकरीसाठी रोख रकमेच्या घोटाळ्याशी संबंधित 33 हून अधिक गुन्हे दाखल केले आहेत. यामध्ये उत्तर गोव्यात 20 हून अधिक आणि दक्षिणेत 13 हून अधिक गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. या घोटाळ्याशी किंवा संघटित रॅकेटने केलेल्या कारवायांशी कोणताही राजकीय संबंध असण्याची शक्यता पोलिसांनी नाकारली आहे.
साल 2014-15 पासून सरकारी नोकरीचे आमिष दाखवून लोकांची फसवणूक झाल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. ऑक्टोबरमध्ये मार्दोळ पोलिसस्थानकात पहिला गुन्हा दाखल झाल्यापासून सर्वाधिक गुन्हे महिलांविरोधात दाखल झाले आहेत. ओल्ड गोव्यातील रहिवासी पूजा नाईक हिच्या विरोधात तक्रार नोंद झाली तेव्हा राज्यातील अधिकाधिक प्रकरणे उघडकीस आली. अनेकांना सरकारी नोकरी देण्याच्या बहाण्याने कोट्यावधी ऊपयांची फसवणूक केल्याचा आरोप झाला आहे. पूजानंतर या प्रकरणात दीपश्री सावंत गावस उर्फ दीपश्री प्रशांत म्हातो, प्रिया यादव, सुनीता शशिकांत पावसकर, श्रुती प्रभुगावकर आणि उमा पाटील यांच्यावरही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. नाईकला अटक झाल्यानंतर लगेचच मुख्यमंत्र्यांनी कडक ताकीद दिली होती की राजकारणी किंवा सरकारी कर्मचारी यांच्यापैकी कोणीही नोकरी घोटाळ्यात गुंतल्याचे आढळून आल्यास त्यांच्यावर सरकारकडून कठोर केली जाईल.
तिनशेहून अधिक लोकांना गंडविले, 21 जणांना अटक
या घोटाळ्यातील आरोपींनी 300 हून अधिक लोकांना फसवल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी 33 हून अधिक तक्रारी नोंद करण्यात आल्या आहेत. कोट्यावधी लोकांना सरकारी नोकरी देण्याचे आश्वासन देऊन सार्वजनिक बांधकाम, जलसंपदा, शिक्षण, वाहतूक, महसूल यासह विभाग पोलिस आणि आरोग्य खात्यात हा घोटाळा करण्यात आला. हा घोटाळा गोव्यातील सहा ठिकाणी पसरला असून आतापर्यंत 21 हून अधिक लोकांना अटक करण्यात आली आहे.