अमेरिका-ब्रिटनच्या तीन तज्ञांना अर्थशास्त्राचे नोबेल
वृत्तसंस्था / स्टॉकहोम
डरॉन, अॅसेमोगलू, सायमन जॉन्सन आणि जेम्स ए. रॉबिन्सन या अमेरिका आणि ब्रिटनमधील तीन विख्यात अर्थतज्ञांना यावर्षीच्या अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. संस्थांची निर्मिती आणि त्यांचा धनसंपत्तीवर परिणाम या विषयावर त्यांनी केलेल्या मौलिक संशोधनासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात येत आहे. त्यांच्या या संशोधनाचे अर्थविश्वावर दूरगामी परिणाम होणार आहेत, असे नोबेल समितीने स्पष्ट केले.
अशा प्रकारे यंदाची सर्व विभागांमधील नोबेल पारितोषिके आता घोषित करण्यात आली आहेत. स्वीडनमधील नोबेल समिती प्रत्येक वर्षी भौतिक शास्त्र, वैद्यकशास्त्र, रसायनशास्त्र, अर्थशास्त्र आणि विश्वशांती या विषयांमध्ये नोबेल पुरस्कारांची घोषणा करते. हा पुरस्कार जगातील सर्वोच्च पुरस्कार आहे.
संस्था आणि देशाची संपत्ती
यंदाच्या अर्थशास्त्र नोबेल पुरस्कार विजेत्यांनी एखाद्या देशाची धनसंपत्ती आणि त्या देशातली आर्थिक-सामाजिक संस्था यांचा परस्पर संबंध कसा असतो, यावर महत्वाचे संशोधन गेली अनेक वर्षे केले आहे. त्यांच्या संशोधनामुळे देशोदेशींच्या आर्थिक परिस्थितीत अंतर का असते आणि आर्थिक प्रगतीमध्ये आर्थिक तसेच सामाजिक संस्थांचे योगदान कसे आणि किती प्रमाणात असते, यावर प्रकाश पडला आहे. हे संशोधन विकसनशील देशांसाठी विशेषत्वाने महत्वाचे आहे. त्यामुळे त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली, असे नोबेल निवड समितीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.
संशोधकांची माहितीही प्रसिद्ध करण्यात आली आहे. आर्थिक-सामाजिक संस्था किंवा सोसिअॅटल इन्स्टिट्यूशन्स ज्या देशांमध्ये भक्कम असतात, त्या देशांमध्ये संपत्तीचे निर्माणकार्य अधिक वेगाने आणि जोमाने होते, असे या संशोधनातून विविध उदाहरणांवरुन सिद्ध करण्यात आले आहे. अशा संस्था आणि देशांची संपत्ती यांचा अन्योन्य संबंध असा असतो हे या संशोधानातून स्पष्ट होते. विकसीत देश, विकसनशील देश आणि निर्धन देश यांच्यात अंतर का आणि कसे पडले हे सुद्धा या संशोधनातून दिसून येते, अशी भलावण नोबेल निवड समितीकडून पुरस्कार घोषित करताना करण्यात आली.
अर्थशास्त्राच्या पुरस्काराची माहिती
मूळ नोबेल पुरस्कारांमध्ये अर्थशास्त्राचा समावेश करण्यात आला नव्हता. मात्र, नंतर 1968 मध्ये तो करण्यात आला. या पुरस्कारासाठी स्वीडनच्या मध्यवर्ती बँकेने निधीची तरतूद केली आहे. आतापर्यंत 93 संशोधकांना अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार देण्यात आला आहे. या विजेत्यांपैकी केवळ तीन महिला आहेत. प्रारंभापासून अर्थशास्त्राला नोबेल पुरस्कार दिला जात नसल्याने काहीवेळा या पुरस्कारचा उल्लेख ‘नकली नोबेल’ असाही केला जातो. मात्र, अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिकाची घोषणाही नोबल निवड समितीकडूनच केली जाते आणि या निवडीच निकष आणि निवड प्रक्रियाही इतर नोबेल पुरस्कारांप्रमाणेच असते. त्यामुळे गुणवत्तेच्या दृष्टीने अर्थशास्त्राचा पुरस्कारही नोबेल पुरस्कारच असतो.