बांबूतून शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती शक्य
बाळाप्पा वैरागी यांचे मार्गदर्शन : हिडकल डॅमवरील वनविभागाच्या रोपवाटिकेत कार्यशाळा
बेळगाव : हुक्केरी तालुक्यात बांबू प्रकल्पाच्या माध्यमातून केंद्र शासन, राज्य शासन शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले आहे. बांबूच्या उत्पादनातून शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती होणार आहे. यासाठी केंद्र व राज्य शासन प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन बांबूचे व्यापारी बाळाप्पा वैरागी यांनी केले. हिडकल डॅमवरील वनविभागाच्या रोपवाटिकेमध्ये शेतकऱ्यांची कार्यशाळा झाली. त्यावेळी खेडकर पर्यटन प्रकल्पाचे संचालक राजशेखर पाटील हे अध्यक्षस्थानी होते. यावेळी बाळाप्पा वैरागी बोलत होते. याप्रसंगी बोलताना पाटील यांनी बांबू पिकाविषयी मार्गदर्शन केले. आर्थिक आणि सामाजिक बदल संस्था, बेंगळूर आणि कर्नाटक शासनाच्या वनविभागाच्यावतीने या कार्यशाळेचे आयोजन केले होते.
भारतीय सामाजिक विज्ञान संशोधन परिषद (आयसीएसएसआर) चे प्रमुख, संशोधक डॉ. विलास जाधव, हुक्केरी तालुक्याचे वनक्षेत्रपाल बी. एल. सनदी, संकेश्वरचे वनपाल राकेश मुरारी, हत्तरगीचे वनपाल पी. डी. संगरी हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. सामाजिक आणि आर्थिक बदल संस्थेचे कार्यकारी संचालक प्रो. प्रमोदकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यशाळा झाली. अन्नपूर्णा राज हिने स्वागत व प्रास्ताविक केले. डॉ. जाधव म्हणाले, पारंपरिक बांबूची उत्पादकता वाढविण्यासाठी आणि शेतकऱ्यांना शाश्वत उत्पन्न मिळवून देण्यासाठी शास्त्राrय पद्धतीने बांबू लागवड आणि मूल्यवर्धनासाठी प्रोत्साहित केले जाणार आहे. पुढील पाच वर्षांसाठी संस्था बेळगाव जिल्ह्यातील हुक्केरी, खानापूर तालुक्यात शेतकऱ्यांसाठी काम करणार आहे. परीक्षेत्र वनाधिकारी सनदी, आजरा बांबू क्लस्टर फाऊंडेशनचे समन्वयक रणजित कालेकर यांचीही भाषणे झाली. वनरक्षक राजू पाटील यांनी आभार मानले.