Eco-Friendly Plates: पळस पानाच्या पत्रावळीवर जेवलाय का कधी?, हा व्यवसाय का धोक्यात येतोय?
ग्रामीण भागातील अनेक पारंपरिक व्यवसायांवर कुऱ्हाड कोसळली आहे
By : बाजीराव पाटील
सडोली खालसा : गावागावात प्लास्टिक व थर्माकोल पत्रावळी बनवण्याच्या मशिनरी पोचलेल्या असून हा व्यवसाय महिला मोठ्या धाडसाने करत आहेत. या व्यवसायात कमी मनुष्यबळ व गुंतवणूकही कमी असल्याने महिला सहजपणे हा व्यवसाय हाताळताना दिसतात.
आज दिवसेंदिवस गावागावात होणारे यांत्रिकीकरण यामुळे ग्रामीण भागातील जवळजवळ सर्वच पारंपरिक व्यवसायांवर कुऱ्हाड कोसळली आहे. त्यामुळे अनेक परंपरागत व्यवसाय करणारे मजूर यांनी पळसच्या पानाच्या पत्रावळी बनवणे जवळजवळ बंदच केले आहे. परंपरागत व्यवसायावर कुऱ्हाड आली आहे.
पळसाच्या पत्रावळीपेक्षा प्लॅस्टिकच्या पत्रावळ्या अधिक स्वस्त मिळत असल्याने सर्वत्र मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिक पत्रावळीचा उपयोग होतो. पळसाच्या पानांपासून पत्रावळी तयार करणारा व्यवसाय हा जवळजवळ इतिहासजमा होत चालला आहे. लग्न असो वा कुठल्याही धार्मिक कार्यक्रमात जेवणावळीला पत्रावळ असणे आवश्यक होते.
पूर्वी पानाच्या पत्रावळी, द्रोणाशिवाय पंगती होत नसत. मात्र आता सर्वत्र आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून यंत्राच्या सहाय्याने प्लास्टिक व थर्माकोल पत्रावळी, द्रोण, ग्लास, चहा-कप तयार केले जात आहेत. या पत्रावळी माफक भावात उपलब्ध असल्याने पळसाच्या पानांपासून तयार केलेल्या पत्रावळी, द्रोण, कालबाह्य होत असल्याचे चित्र ग्रामीण भागासह शहरातही दिसून येत आहे.
ग्रामीण भागात विशेषत: कोकण, डोंगर भागात भागात एक महत्त्वाचा व्यवसाय म्हणून गुरव समाजात मोठ्या प्रमाणात हा व्यवसाय केला जात होता. पत्रावळी बनवण्यासाठी विशिष्ट झाडांच्या पानांचा उपयोग होतो. त्यामध्ये मोह, पळस या झाडांच्या पानांचा वापर केला जातो.
या पत्रावळीवर केलेले जेवण नागरिकांना स्वादिष्ट व चवदार वाटायचे. ग्रामीण भागातील पत्रावळी तयार करणारे मजूर सकाळी लवकर उठून डोंगर भागात जायचे व या झाडाची पाने खुडून आणायचे व त्यांच्या कुटुंबातील प्रत्येक जण या आणलेल्या पानांपासून पत्रावळी तयार करण्यासाठी लगबग करायचे.
एक व्यक्ती दिवसभर साधारणपणे 150 ते 200 पत्रावळी तयार करत असत. यातून त्यांना कामाचा योग्य प्रमाणात मोबदला मिळत असे. मात्र यासाठी मोठी मेहनत करावी लागत असे. तसेच वेळही भरपूर लागत असे. या पानांच्या पत्रावळी तयार करून व विक्री करून असंख्य कुटुंबांचा उदरनिर्वाह व उपजीविका यावर चालत असे.
तयार झालेल्या पत्रावळी विशिष्ट संख्येत एकत्र करून ते संबंधितांना विकल्या जायच्या. यातून अनेक कुटुंबांना रोजगार उपलब्ध होत. आज काही ठिकाणी पळसाच्या पानाच्या पत्रावळी उपलब्ध असून साधारण तीन ते पाच रुपये प्रति नग. असा दर असल्याचे समजते.
मशिनमुळे प्लास्टिकच्या पत्रावळी व द्रोण अत्यंत कमी वेळेत तयार होत आहेत. त्यामुळे पत्रावळी तयार करून आपला प्रपंच चालविणाऱ्यावर उपासमारीची वेळ आली आहे. तर काहींना दुसऱ्या व्यवसायाकडे वळावे लागले आहे. त्यामुळे पानाच्या पत्रावळी दिसून येत नाही. त्या आता नामशेष होण्याच्या मार्गावर दिसत आहेत.
पूर्वी घरगुती सभा समारंभ कार्यक्रमात जेवणावळीत पळसाच्या पानाच्या पत्रावळीचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात होता. त्यावेळी कार्यक्रम झाल्यानंतर या पत्रावळी एकत्र करून पेटवून नष्ट केल्या जात होत्या. परंतु सध्या नवीन आलेल्या प्लॅस्टिकच्या पत्रावळ्या व थर्माकोलचे द्रोण सर्वत्र पडलेले असतात. नव्याने गावागावात कोंडाळे तयार झाले. त्याने कचऱ्याची एक समस्या भेडसावत आहे.
सध्या पानाच्या पत्रावळळ्यांच्या मागणीत घट
"पळसाच्या पानाच्या पत्रावळ्या बनवणे आमचा व्यवसाय परंपरागत होता. परंतु या व्यवसायात आता पळसाची पाने मिळत नसल्याने हा व्यवसाय लोप पावत आहे. सध्या बाजारात मोठ्या प्रमाणात प्लास्टिकच्या पत्रावळी द्रोण आल्याने या पत्रावळ मागणी कमी झाले आहे. किंबहुना व्यवसायाला प्रतिसाद कमी झाला आहे तसेच पत्रावळी बनवणारे व्यवसाय कारागीर कमी झाले आहेत."
- दिगंबर गुरव, पत्रावळी व्यावसायिक.
प्लॅस्टिक पत्रावळीला ग्राहकांची
मागणी जास्त
"आमचे गेले 40 वर्षे आमचे किराणा मालाचे दुकान आहे. या दुकानातून पत्रावळीची विक्री केली. पळसाच्या पानाची पत्रावळी मागणी असायची. प्लास्टिक पत्रावळी आल्याने हा व्यवसाय बंद करून लोकांनी प्रेस प्लास्टिक पत्रावळी तयार करणारी मशिनरी बसवल्याने प्लास्टिक पत्रावळी मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. प्लास्टिक पत्रावळी बनवण्याचा गावागावात मोठ्या प्रमाणात हा व्यवसाय वाढला आहे."
- विष्णू पाटील, किराणा दुकानदार, बाचणी.