ऑलिम्पिक खेळाडूंसाठी ‘खाण्याची मेजवानी’
शाकाहारी पदार्थांवर भर : अनेक फ्रेंच डिशेसचा समावेश
वृत्तसंस्था/ पॅरिस
ऑलिम्पिक स्पर्धा सुरु होण्यास अवघ्या काही तासांचा कालावधी राहिला आहे. 206 देशातील तब्बल 10,500 खेळाडू या स्पर्धेत सहभागी होणार आहे. फ्रान्स सरकारने देखील स्पर्धेसाठी मोठा खर्च केला असून खेळाडूंना अनेक सोयीसुविधा पुरवण्यावर भर दिला आहे. याशिवाय, जगभरातील अनेक खेळाडू सहभागी होणार असल्याने खेळाडूंच्या खाण्यापिण्यावर देखील विशेष भर दिला गेला आहे. खेळाडूसाठी अनेक फ्रेंच डिशेससह अनेक शाकाहारी पदार्थ तयार करण्यात येत आहेत.
पॅरिसमधील क्रीडाग्राममध्ये अनेक देशांचे खेळाडू वास्तव्यास आहेत. या खेळाडूंसाठी बहुतांश फळे, भाज्यांची मोठ्या प्रमाणात आयात करण्यात आली आहे. याशिवाय अनेक फळभाज्या, कडधान्ये, चीज, दुग्धजन्य पदार्थ खेळाडूंना देण्यात येणार आहे. यासाठी ऑलिम्पिक प्रशासन स्वत: देखरेख ठेवत आहे. अर्थात, अॅथलिट व अन्य खेळाडूंसाठी मांसाहारी पदार्थांची मेजवानी असणार आहे पण त्याचे प्रमाण कमी प्रमाणात आहे. यंदा ऑलिम्पिक प्रशासनाने शाकाहारी जेवणावर भर दिला असल्याने मांसाहारी जेवणात फक्त चिकनचा वापर करण्यात येणार आहे. याशिवाय, फास्ट फूडचे स्टॉल याठिकाणी लावण्यास मज्जाव करण्यात आला आहे.
विशेष म्हणजे, पॅरिस शहर हे आपल्या विशिष्ट खाद्यपदार्थासाठी प्रसिद्ध आहे. याठिकाणी मिळणारे वेगवेगळे फ्रेंच सूप, पॅन केक यासारख्या काही खाद्यपदार्थांचा देखील खेळाडूंच्या आहारात समावेश करण्यात आला आहे. खेळाडूंच्या देण्यात येणाऱ्या अशाच काही पदार्थांचा घेतलेला आढावा
- कोक ऑ विन : हे पॅरिसमधील एक क्लासिक फ्रेंच सूप आहे, ज्यामध्ये चिकन लाल वाइन, मशरूम, कांदे आणि बेसनसह शिजवले जाते.
- बोइलाबेसे : हे फ्रेंच फिश सूप आहे, जे विशेषत: दक्षिण फ्रान्समधील मार्सिले शहराचे एक खास डिश मानले जाते. हे सूप टोमॅटो, वांगी, झुचीनी, लाल मिरची आणि कांद्यापासून बनवले जाते. आरोग्याच्या दृष्टिकोनातूनही हे खूप फायदेशीर मानले जाते.
- क्विच लॉरेन : ही एक क्लासिक फ्रेंच डिश आहे. ही डिश लहान क्रस्ट पॅटीवर बेक केली जाते आणि त्यात बेसन, कांदा, चीज, अंडी, कस्टर्डसारखे घटक असतात. ही डिश आपल्या स्वादिष्ट चवीसाठी ओळखली जाते.
- क्रेप्स डिश : क्रेप्स हे फ्रान्सचे प्रसिद्ध डिश आहे, जे पातळ पॅनकेक्ससारखे आहे. हे गोड आणि खारट दोन्ही प्रकारे बनवता येते. गोड क्रेपमध्ये साखर, लिंबाचा रस, मध, मॅपल सिरप, चॉकलेट सॉस, फळे, आईक्रीम यासारख्या घटकांचा वापर केला जातो.