चार आठवड्यांमध्ये 720 अंड्यांचे भक्षण
अंडे ही खाण्याची एक लोकप्रिय वस्तू आहे. त्यावर गाणीही लिहिली गेली आहेत. तसेच काहीवेळा तो चेष्टेचाही विषय बनविला गेला आहे. संडे हो या मंडे, रोज खाओ अंडे’ हे घोषवाक्य तर प्रसिद्धच आहे. अंड्यांचे लाभ अनेक सांगितले जातात. त्यातील प्रथिनांमुळे शरीर भक्कम बनते. मेंदूही तल्लख होतो. भूक चांगली भागते आणि शरिराचे पोषण उत्तम प्रकारे होते, असे आहारशास्त्र म्हणते. अलिकडच्या काळात अंडे मांसाहारी नसून शाकाहारी आहे, असे काही तज्ञांनी सिद्ध केल्याने एरवी शाकाहारी असणारी माणसेही अंडी खाणे वावगे मानत नाहीत.
पण अंडी बहुगुणी मानली जात असली, तरी ती किती खावीत याला मर्यादा आहे. दिवसातून एक-दोन किंवा जास्तीत जास्त तीन-चार अंडी पुरेशी असतात असे मानले जाते. तथापि, निक होरोविट्स नामक विद्यार्थ्याने हार्वर्ड विद्यापीठात एक अद्भूत प्रयोग केला. त्याने इतर काही न खाता केवळ अंड्यांवरच उदरनिर्वाह करण्याचा निर्धार केला. अशा प्रकारे त्याने चार आठवड्यांमध्ये 720 अंड्यांचे भक्षण केले. याचा अर्थ त्याने सरासरी प्रतिदिन 25 अंडी खाल्ली. किंवा प्रत्येक तासाला एक अंडे खाल्ले. अंडे अधिक खाल्ल्याने शरीरात वाईट कोलेस्ट्रॉल वाढते. याचा त्या व्यक्तीला मोठा त्रास होऊ शकतो. तथापि, होरोविट्स याला वेगळाच अनुभव आला. त्याचे कोलेस्ट्रॉल प्रमाण वाढण्याऐवजी कमी झाल्याचे दिसून आले. त्यामुळे आता डॉक्टर्स अंडे आणि कोलेस्ट्रॉल यांच्या संबंधांवर पुनर्विचार करीत आहेत. अर्थात, जोपर्यंत डॉक्टर्स अनुमती देत नाहीत, तो पर्यंत असे प्रयोग कोणीही करु नयेत. कारण एकाला जो अनुभव आला तोच प्रत्येकाला येईल असे नसते. त्यामुळे स्वत:च्या बुद्धीने आणि आहारतज्ञांचा सल्ला घेतल्याशिवाय असे प्रयोग कोणीही करी नयेत, असा स्पष्ट इशारा तज्ञांनी दिला आहे.