बिर्याणी खा, एक लाख जिंका
कोइम्बतूरमध्ये होतेय स्पर्धा
जगभरात आणि खासकरून भारतात बिर्याणीच्या शौकिनांची संख्या कमी नाही. अलिकडेच तामिळनाडूच्या कोइम्बतूरमध्ये बिर्याणी प्रेमींसाठी अनोखी स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे. येथील बोचा एक्सप्रेस ट्रेन हॉटेलमध्ये एक बिर्याणी स्पर्धा ठेवण्यात आली असून यात बिर्याणी खाल्ल्यावर इनाम दिले जात आहे.
जर एखाद्या ग्राहकाने 30 मिनिटांच्या आत 6 प्लेट बिर्याणी फस्त केली तर त्याला एक लाख रुपयांचे बक्षीस देण्याची घोषणा हॉटेलच्या व्यवस्थापनाने केली आहे. 6 प्लेटयुक्त स्पर्धेसोबत 4 प्लेट बिर्याणी खाल्ल्यावर 25 हजार रुपयांचे इनाम मिळणार आहे.
या स्पर्धेच्या घोषणेनंतर हॉटेलमध्ये बिर्याणी खाण्यासाठी मोठी गर्दी होत आहे. रेस्टॉरंटने एक व्हिडिओ देखील जारी केला असून यात अनेक लोक रांगेत बसून बिर्याणी खाताना दिसून येतात. तर दुसरीकडे कोइम्बतूर पोलिसांनी रेस्टॉरंटच्या विरोधात गुन्हा नोंदविला असल्याचे समजते. अनधिकृत बिर्याणी स्पर्धा आयोजित केल्याने परिसरात वाहतूक कोंडी आणि गोंधळ झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
अशाप्रकारची स्पर्धा पहिल्यांदाच आयोजित करण्यात आलेली नाही. काही काळापूर्वी एका हॉटेलमध्ये भरभक्कम बुलेट थाळी खाल्ल्यावर बुलेट बाइक बक्षीसादाखल दिली जात होती. याचबरोबर अनेक ठिकाणी अशाप्रकारच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आलेले आहे.