ऑस्ट्रेलियाचा किवीजवर सहज विजय
‘सामनावीर’ शूटचे 3 धावांत 3 बळी, न्यूझीलंड पराभूत
वृत्तसंस्था/ शारजा
2024 च्या आयसीसी महिलांच्या विश्वचषक टी-20 क्रिकेट स्पर्धेत विद्यमान विजेत्या आणि बलाढ्या ऑस्ट्रेलियाने आपली विजयी घोडदौड कायम राखली आहे. या स्पर्धेतील मंगळवारी झालेल्या अ गटातील सामन्यात ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडचा 60 धावांनी पराभव केला. ऑस्ट्रेलियाच्या मेगन शूटला ‘सामनावीर’ म्हणून घोषित करण्यात आले. तिने 3 धावांत 3 गडी बाद केले.
या स्पर्धेत ऑस्ट्रेलियाचा हा सलग दुसरा विजय असून ते अ गटात आघाडीच्या स्थानावर आहेत. न्यूझीलंडने या स्पर्धेत 1 सामना जिंकला असून 1 सामना गमविला आहे. न्यूझीलंडने यापूर्वी भारतावर विजय मिळविला होता. न्यूझीलंडच्या या पराभवामुळे भारताला या गटात दुसरे स्थान मिळविण्याची संधी उपलब्ध झाली असली तरी त्यांना उर्वरित दोन सामन्यांत मोठ्या फरकाने विजय मिळविणे जरुरीचे आहे. न्यूझीलंडची आता तिसऱ्या स्थानावर घसरण झाली असून पाकने दुसरे स्थान मिळविले आहे. भारत अद्यापही चौथ्या स्थानावर आहे.
मंगळवारच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 8 बाद 148 धावा जमविल्या. त्यानंतर न्यूझीलंडचा डाव 19.2 षटकात 88 धावांत आटोपला.
ऑस्ट्रेलियाच्या डावात बेथ मुनीने 32 चेंडूत 2 चौकारांसह 40, एलीस पेरीने 24 चेंडूत 1 षटकार आणि 3 चौकारांसह 30, कर्णधार हिलीने 20 चेंडूत 4 चौकारांसह 26, लिचफिल्डने 18 चेंडूत 2 चौकारांसह 18 धावा जमविल्या. मॅकग्राने 1 चौकारासह 9 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाच्या डावात 1 षटकार आणि 13 चौकार नोंदविले गेले. न्यूझीलंडतर्फे अॅमेलिया केरने 26 धावांत 4 तर रोसमेरी मेअर आणि हॅलिडे यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले.
प्रत्युत्तरादाखल खेळताना न्यूझीलंडच्या डावात अॅमेलिया केरने 31 चेंडूत 3 चौकारांसह 29, बेट्सने 27 चेंडूत 2 चौकारांसह 20 आणि ताहुहूने 10 चेंडूत 1 चौकारांसह 11 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाच्या भेदक आणि अचूक गोलंदाजीसमोर न्यूझीलंडचे फलंदाज ठराविक अंतराने बाद झाले. न्यूझीलंडच्या डावात 6 चौकार नोंदविले गेले. ऑस्ट्रेलियातर्फे मेगन शूटने 3 धावांत 3, सदरलॅन्डने 21 धावांत 3, मॉलिन्युक्सने 15 धावांत 2 तर वेअरहॅम आणि मॅकग्रा यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक: ऑस्ट्रेलिया 20 षटकात 8 बाद 148 (मुनी 40, पेरी 30, हिली 26, लिचफिल्ड 18, अवांतर 6, अॅमेलिया केर 4-26, मेअर 2-22, हॅलिडे 2-16), न्यूझीलंड 19.2 षटकात सर्वबाद 88 (अॅमेलिया केर 29, बेटस् 20, ताहूहू 11, अवांतर 4, मेगन शूट 3-3, सदरलँड 3-21, मॉलिन्युक्स 2-15, वेअरहॅम व मॅकग्रा प्रत्येकी 1 बळी)