ईस्ट बंगाल एएफसी महिला चॅम्पियन्स लीगमधून बाहेर
वृत्तसंस्था/ वुहान (चीन)
रविवारी उझबेकिस्तानच्या पीएफसी नसाफकडून 0-3 असा पराभव पत्करावा लागल्यानंतर ईस्ट बंगाल संघ एएफसी महिला चॅम्पियन्स लीगच्या गट फेरीतून बाहेर पडला आहे. नसाफच्या दियोराखोन खाबीबुल्लाएव्हा (18 व्या आणि 98 व्या मिनिटाला) हिने दोन गोल केले, तर झरिना नोरबोएव्हाने 52 व्या मिनिटाला लक्ष्य गाठले.
ईस्ट बंगालने त्यांच्या पदार्पणाच्या मोहिमेचा शेवट तीन गुणांसह केला, जे त्यांना तिसऱ्या क्रमांकावरील दोन सर्वोत्तम संघांपैकी एक म्हणून पुढे नेण्यासाठी पुरेसे नाही. त्यांनी यापूर्वी गट ‘ब’मध्ये इराणच्या बाम खातून एफसीचा 3-1 असा पराभव केला होता आणि चीनच्या वुहान जियांगदा एफसीकडून 0-2 असा पराभव पत्करला होता. या विजयामुळे उझबेकिस्तान संघाचे चार गुण झाले आहेत, ज्यामुळे त्यांना तिसऱ्या क्रमांकावरील सर्वोत्तम संघांपैकी एक म्हणून क्वार्टरफायनलमध्ये स्थान निश्चित झाले आहे.
सुऊवातीच्या शिट्टीपासून नसाफने खेळावर नियंत्रण ठेवले. नसाफची कर्णधार नीलुफर कुद्रातोव्हाने 18 व्या मिनिटाला ईस्ट बंगालच्या गोलक्षेत्रात घेतलेली धाव निर्णायक ठरली. यावेळी तिने डायोरखोन खाबीबुल्लाएव्हाला चेंडू पुरविला आणि तिने गोलाची नोंद केली. या गोलमुळे उझबेकिस्तान संघावरील दबाव कमी झाला. नंतर त्यांनी मुक्तपणे फुटबॉल खेळण्यास सुऊवात केली आणि फक्त क्रॉसबारने झरिना मामतकरीमोव्हा आणि गुलझोदा अमीरोव्हा यांच्या प्रयत्नांना रोखले नसते, तर त्यांची आघाडी आणखी वाढली असती.
मध्यांतरानंतरही नसाफने खेळावर घट्ट पकड ठेवली आणि सात मिनिटांनी झरिना नोरबोएव्हाने योग्य वेळी योग्य ठिकाणी असलेल्या ल्युडमिला कराचिकच्या क्रॉसवर गोल करून आघाडी वाढवली. नसाफने स्टॉपेज वेळेत तिसरा गोल करत प्रभावी कामगिरीवर शिक्कामोर्तब केले. यावेळी ईस्ट बंगालच्या एलांगबाम पंथोई चानूने कराचिकचा सुऊवातीचा प्रयत्न निष्फळ ठरविला, पण परत आलेल्या चेंडूवर खाबीबुल्लाएव्हाला रोखण्यासाठी ती काहीही करू शकली नाही.