For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

म्यानमार, थायलंडसह पाच देशांमध्ये भूकंप

06:58 AM Mar 29, 2025 IST | Tarun Bharat Portal
म्यानमार  थायलंडसह पाच देशांमध्ये भूकंप
Advertisement

 म्यानमारमध्ये 144 जणांचा मृत्यू : साडेसातशेहून अधिक लोक जखमी : बँकॉकमध्ये इमारत कोसळून 80 जण बेपत्ता

Advertisement

वृत्तसंस्था/ .बँकॉक

म्यानमार, थायलंडसह आजुबाजुचे पाच देश शुक्रवारी भूकंपाच्या तीव्र धक्क्यांनी हादरले. भूकंपमापन यंत्रावर या भूकंपाची तीव्रता 7.7 रिश्टर स्केल इतकी होती. भूकंपाचे केंद्र म्यानमारमधील सागाईंग येथे होते. या भूकंपाचा सर्वात मोठा तडाखा म्यानमारला बसला असून 144 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती शुक्रवारी रात्री प्रशासनाकडून जारी करण्यात आली. तसेच साडेसातशेहून अधिक लोक जखमी असून त्यांच्यावर विविध इस्पितळांमध्ये उपचार सुरू आहेत. या मोठ्या नैसर्गिक आपत्तीमधील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. येथे मदत व बचावासाठी प्रशासनाकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.

Advertisement

म्यानमारमध्ये शुक्रवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले. म्यानमारमधील मंडाले येथील इरावती नदीवरील लोकप्रिय अवा पूल भूकंपाच्या धक्क्यामुळे कोसळल्याचे वृत्त आहे. चीन आणि तैवानच्या काही भागातही भूकंपाचे धक्के जाणवल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच भारताच्या काही राज्यांनाही सौम्य झटके जाणवले. अनेक भागात बचावकार्य सुरू आहे. म्यानमारनंतर थायलंड, बांगलादेश, भारत आणि चीनमध्येही भूकंपाने जमीन हादरली. पण सर्वात जास्त नुकसान म्यानमार आणि थायलंडमध्ये झाले. मोठ्या प्रमाणात झालेल्या विध्वंसाच्या पार्श्वभूमीवर थायलंडच्या पंतप्रधानांनी बँकॉकमध्ये आणीबाणी लागू केली आहे. थायलंडची राजधानी बँकॉकमध्ये भूकंपामुळे मोठे नुकसान झाले आहे. येथे भूकंपामुळे दोन जणांचा मृत्यू झाला आहे. बँकॉकमध्ये कोसळलेल्या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली जवळपास 80 जण अडकल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.

भूकंपामुळे म्यानमारच्या राजधानीतही आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. म्यानमारमध्ये 7.7 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपात 25 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. म्यानमारमधील मंडाले येथे 20 जणांचा मृत्यू झाला, तर तौंगू येथे 5 जणांचा मृत्यू झाला. या आपत्तीमध्ये अनेक जण जखमी झाले आहेत. मुख्य धक्क्यानंतर जाणवणाऱ्या अन्य हादऱ्यांमुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. भूकंपाच्या तीव्र धक्क्यांनी वेगवेगळ्या भागात इमारती-घरे कोसळली असून अनेक लोक अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. घरांसोबतच रस्त्यांना भेगा पडणे, वृक्ष कोसळणे, वीजखांब तुटणे असे प्रकारही घडल्यामुळे दैनंदिन जनजीवन विस्कळीत झाले आहे. रस्ते, विमान, रेल्वे आदी वाहतूक सेवेवरही याचा विपरित परिणाम झाला आहे.

म्यानमार आणि थायलंडनंतर मेघालयातील गारो हिल्समध्येही 4.0 तीव्रतेचा भूकंप जाणवला. सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असून त्यामध्ये भूकंपाच्या धक्क्यांमुळे गगनचुंबी इमारती थरथरताना दिसत आहेत. अनेक इमारती कलंडल्या असून काही पूर्णपणे जमीनदोस्त झाल्या आहेत. बांगलादेशातही भूकंपाचे धक्के जाणवले. येथील तीव्रता 7.3 रिश्टर स्केल इतकी होती. ढाका आणि चितगावसह बांगलादेशातील अनेक शहरांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. तथापि, येथे अद्याप कोणत्याही जीवितहानीबद्दलचे वृत्त नाही.

थायलंडच्या विमानतळावर लॉकडाऊन, उड्डाणे रद्द

थायलंड आणि म्यानमारमधील अनेक शहरांमध्ये इमारती कोसळल्या आहेत. बँकॉकमध्ये बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अनेक लोक अडकल्याची भीती आहे. भूकंपानंतर पंतप्रधानांनी बँकॉकमध्ये आणीबाणी लागू केली आहे. भूकंपामुळे बँकॉक पूर्णपणे बंद आहे. मेट्रो सेवा बंद करण्यात आल्या आहेत. शेअर बाजारातही व्यवहार थांबले आहेत. विमानतळ आणि भुयारी मार्ग बंद करण्यात आले आहेत.

भूकंपग्रस्त देशांना मदतीची पंतप्रधान मोदींची घोषणा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्यानमार आणि थायलंडमधील भूकंपानंतरच्या परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. तसेच त्यांनी या देशांना नैसर्गिक आपत्तीमध्ये आवश्यक मदत करण्याची घोषणा पंतप्रधानांनी केली. म्यानमार आणि थायलंडमधील भूकंपग्रस्तांच्या सुरक्षिततेसाठी मी प्रार्थना करत आहे. या देशांना भारत सर्वतोपरी मदत करण्यास तयार आहे. आम्ही प्रशासनाला यासंदर्भात सतर्क राहण्यास सांगितले आहे. यासोबतच, परराष्ट्र मंत्रालयाला म्यानमार आणि थायलंडच्या सरकारांशी संपर्कात राहण्यास सांगण्यात आल्याचे पंतप्रधानांनी स्पष्ट केले.

Advertisement
Tags :

.