बांगला देशला भूकंपाचा धक्का
आतापर्यंत सहा ठार, अनेक इमारती धाराशायी
वृत्तसंस्था / ढाका
बांगला देशला भूकंपाचा मोठा धक्का बसला आहे. या धक्क्यात आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू झाल्याची घोषणा करण्यात आली असून अनेक जण जखमी आहेत. मोठ्या संख्येने इमारती कोसळल्या असून त्यांच्या ढिगाऱ्याखाली अनेकजण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे मृतांची संख्या वाढू शकते.

या भूकंपाचे केंद्र बांगला देशची राजधानी ढाकापासून साधारणत: 25 किलोमीटरच्या अंतरावर असणाऱ्या नरसिंगदी जिल्ह्यातील घोरशाल येथे आहे. या भूकंपाची तीव्रता 5.5 रिस्टर इतकी होती. मात्र, तो दाट नागरी वस्तीत झाल्याने मानवहानी अधिक होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. भूकंपाचे केंद्र भूमीखाली 10 किलोमीटरवर होते, अशी माहिती तेथील प्रशासनाने दिली आहे.
आठ मजली इमारतीची हानी
कोशीतुली भागात एका आठ मजली इमारतीचा कठडा कोसळल्याने किमान 3 जण ठार झाले आहेत. कठडा कोसळल्याने इमारतीची मोठी हानी झाली असून ही इमारतही कोसळण्याच्या परिस्थितीत आहे. इतरही अनेक इमारतींची मोठी हानी झाली असून किमान 50 कच्च्या बांधकामाच्या इमारती कोसळल्या आहेत. आपत्ती निवारणाचे कार्य केले जात आहे. तथापि, त्यात अडथळे येत आहेत. गेल्या काही वर्षांमधील या देशातील हा सर्वात मोठा भूकंप असल्याचे दिसून येत आहे.
दहा मजली इमारत जमीनदोस्त
अर्मानितोला भागात एक दहा मजली इमारत पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळली, अशी माहिती स्थानिकांनी दिली आहे. भूकंपाचा इशारा मिळताच इमारत रिकामी करण्यात येत होती. तथापि, अनेकांना बाहेर पडता आले नव्हते. या दुर्घटनेत किती जीवितहानी झाली, याची माहिती देण्यात आलेली नाही. पण अनेक नागरिक इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकले असल्याची शक्यता व्यक्त होत आहे. खिलगांव येथे एक निर्माणाधीन इमारत कोसळून काही लोक जखमी झाले आहेत.
पश्चिम बंगालमध्येही धक्के
बांगला देशातील या भूकंपाचा परिणाम पश्चिम बंगालमध्येही जाणवला. या राज्याची राजधानी कोलकाता येथेही हा धक्का जाणवला. काही इमारतींची तावदाने तुटली तर काही इमारतींना भेगा पडल्या आहेत. तथापि, राज्यात कोठेही जीवितहानी झाल्याची माहिती आतापर्यंत तरी देण्यात आलेली नाही. मात्र, आपत्तीनिवारण व्यवस्थेला सज्ज राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.