पृथ्वीला आहेत दोन चंद्र
पृथ्वीला एकच चंद्र आहे, अशी सर्वांची समजूत आहे. तथापि, अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’ चे म्हणणे असे आहे की पृथ्वीला 2 चंद्र आहेत. हा दुसरा चंद्र पृथ्वीला याच वर्षी अर्थात 2025 मध्ये मिळाला आहे. नासाचे हे म्हणणे कोणालाही आश्चर्यकारकच वाटेल. पण या संस्थेने याची कारणे स्पष्ट करत, सर्व शंकांचे निरसन केले आहे. पृथ्वीला प्राप्त झालेला हा दुसरा ‘चंद्र’ नेहमीच्या चंद्रापेक्षा भिन्न आहे. हा नवा चंद्र एक लघुग्रह असून तो पृथ्वीच्या खूप नजीक आल्याने तो चंद्रासारखा भासत आहे. अर्थात, तो अत्यंत छोटा आहे. त्याचा व्यास अवघा 18 ते 36 मीटर इतकाच आहे. त्यामुळे नुसत्या डोळ्यांना तो दिसू शकत नाही. तसेच तांत्रिकदृष्ट्या तो ‘चंद्र’ नाहीच. खगोलशास्त्राने त्याला ‘अर्थचंद्र’ मानले असून त्याचे नामकरण ‘2025 पीएन 7’ असे केले आहे.
हा ‘चंद्र’ नेमका काय प्रकार आहे, हे देखील नासाने स्पष्ट केले आहे. हा चंद्र म्हणजे अवकाशातील एक दुर्मिळ वस्तू असून तो पृथ्वीसमवेत जवळपास तिच्याच वेगाने सूर्याभोवती फिरत आहे. तो 2083 पर्यंत पृथ्वीसोबत असेल. सध्या तो पृथ्वीच्या अगदी जवळ असल्याने तो जणू काही चंद्रच असल्याप्रमाणे जाणवत आहे. त्याचे आणखी एक महत्वाचे वैशिष्ट्या असे, की तो नेहमीच्या चंद्राप्रमाणे पृथ्वीशी गुरुत्वाकर्षणाच्या बंधाने बांधला गेलेला नाही. त्याचा गुरुत्वाकर्षणीय संबंध थेट सूर्याशी आहे. नेहमीचा चंद्र ज्याप्रमाणे पृथ्वीभोवती फिरतो आणि पृथ्वीभोवती फिरता फिरता तो सूर्याभोवतीही प्रदक्षिणा घालतो. पण हा लघुचंद्र पृथ्वीपासून स्वतंत्र असून तो सूर्याभोवती प्रदक्षिणा घालतो. तरीही त्याला चंद्र मानलेले आहे.
‘नासा’ने अशा पृथ्वीच्या कक्षेजवळून सूर्याभोवती फिरणाऱ्या 8 ‘लघुचंद्रां’चा शोध लावलेला आहे. हे चंद्र सूर्याभोवती फिरत आहेत. फिरण्याच्या या कालक्रमात काही विशिष्ट कालखंडात ते पृथ्वीच्या जवळ येतात पृथ्वीसह सूर्याची परिक्रमा करतात. त्यामुळे ते चंद्रासारखे वाटतात. सध्या हीच प्रक्रिया होत आहे. हा चंद्र आणखी काही दशके पृथ्वीसमवेत राहणार असून या काळात तो पृथ्वीप्रमाणेच सूर्याची प्रदक्षिणा करेल. नंतर तो पृथ्वीपासून दूर जाईल आणि दिसेनासा होईल. पण तो सूर्याभोवती फिरतच राहील. ही एक सतत चालणारी प्रक्रिया असून ती समजून तिचा अभ्यास करण्याची आवश्यकता आहे, असे नासाचे प्रतिपादन आहे.