काम न करता 16 वर्षांमध्ये कमाविले 11 कोटी
जर्मनीच्या महिलेची कहाणी होतेय व्हायरल
कुठलेही काम न करता 16 वर्षांपर्यंत 11 कोटी रुपयांहून अधिक कमाई केली आणि तरीही नोकरी कायम राहिल्यास कुणाला आनंद होणार नाही. हा प्रकार विचित्र वाटत असला तरीही जर्मनीत असे घडले आहे. हे प्रकरण आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जर्मनीच्या नॉर्थ राइन-वेस्टफेलिया राज्यातील एक महिला शिक्षिका 2009 पासून आतापर्यंत पूर्ण 16 वर्षांपासून आजारपणाच्या सुटीवर आहे. यादरम्यान तिने एक दिवसही शाळेत काम केले नाही, परंतु दर महिन्याला ती पूर्ण पगार घेत राहिली. जर्मनीत शिक्षकांना दर महिन्याला सुमारे 6174 युरो (सुमारे 6.3 लाख रुपये) इतका पगार मिळतो, वर्षाकाठी हा आकडा जवळपास 72 हजार युरो (74 लाख रुपये) होतो. म्हणजेच 16 वर्षांमध्ये ही रक्कम 1 दशलक्ष युरो (सुमारे 11.6 कोटी रुपये)हून अधिक झाली आहे.
अलिकडेच शाळेत नवे नेतृत्व आल्यावर अंतर्गत चौकशी झाली असता महिला दर महिन्याला वैद्यकीय प्रमाणपत्र देत राहिल्याचे, परंतु कधीच कुठल्याही अधिकृत वैद्यकीय तज्ञाकडून तिच्या आजारपणाची तपासणी करण्यात आली नसल्याचे स्पष्ट झाले. शाळेने वैद्यकीय तपासणी करविण्याची सूचना केली असता महिलेने नकार दिला आणि शाळेच्या विरोधात खटला दाखल केला.
न्यायालयाने काय म्हटले?
जर्मनीच्या न्यायालयाने संबंधित महिलेची याचिका फेटाळत ही स्थिती वास्तवात समजून घेण्याच्या पलिकडची असल्याचे उद्गार काढले तसेच नियुक्तीदाराला आजारपणाचा पुरावा मागण्याचा पूर्ण अधिकार असल्याचे स्पष्ट केले. याचबरोबर महिलेला 2500 युरोंचा कायदेशीर खर्च भरण्याचा आदेश दिला आहे.
शिक्षिकेने सुरू केला स्टार्टअप
हे प्रकरण वादात आहे कारण या दीर्घ रजेदरम्यान महिलेने एक मेडिकल स्टार्टअप सुरू केले हेते. जर हे सिद्ध झाले तर हा प्रकार नियमांचे उल्लंघन करणारा असेल आणि तिला स्वत:ची नोकरी, वेतन आणि पेन्शन लाभापासून वंचित रहावे लागू शकते.