मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना बॉम्बस्फोटाच्या धमकीचा ई-मेल
2.5 मिलियन डॉसर्लची मागणी : धमकी देणाऱ्याचा शोध जारी
प्रतिनिधी/ बेंगळूर
बेंगळूरच्या रामेश्वरम कॅफेतील बॉम्बस्फोटाच्या घटनेनंतर राज्यातील विविध ठिकाणी घातपात घडविण्याची धमकी देण्यात आली आहे. 2.5 मिलियन डॉलर्स द्या; अन्यथा रेल्वेस्थानक, बसस्थानकासह विविध ठिकाणी बॉम्बस्फोट करण्यात येतील, अशा धमकीचा ई-मेल मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री आणि बेंगळूर शहर पोलीस आयुक्तांना पाठविण्यात आला आहे.
रामेश्वरम कॅफेमध्ये स्फोट घडविण्यात आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री व बेंगळूर पोलीस आयुक्तांना रेल्वेस्थानक, बसस्थानकांवर बॉम्बस्फोट घडविण्याची ई-मेलवरून धमकी देण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला असून ई-मेल आयडीच्या आधारे धमकी देणाऱ्याचा शोध सुरू केला आहे.
2 मार्च रोजी दुपारी 2:48 वाजता धमकीचा ई-मेल पाठविण्यात आला होता. सायबर गुन्हे पोलीस स्थानकात याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला आहे. धमकीसाठी एंड टू एंड एन्स्कि्रप्टेड ई-मेल सर्व्हिसचा वापर करून शाहिद यान या नावाने ई-मेल पाठविण्यात आला आहे.
रामेश्वरम कॅफेमधील घटना ही टेलर असल्याचा उल्लेख धमकीच्या ई-मेलमध्ये आहे. 2.5 मिलियन डॉलर्स न दिल्यास कर्नाटकातील बस, रेल्वे, टॅक्सी, मंदिरे, हॉटेलसह सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर स्फोट घडविण्यात येतील, अशी धमकी देण्यात आली आहे. दोन टेलर दाखविण्यासाठी आम्ही सज्ज असून अंबारी उत्सव बसमध्ये स्फोट घडविण्यात येईल. आमच्या मागण्या, पुढील वाटचाल आणि सध्या पाठविण्यात आलेला ई-मेल संदेश सोशल मीडियावर व्हायरल करण्यात येईल, असा उल्लेखही त्यात करण्यात आला आहे.