Solapur : सोलापूरात ई-केवायसीचा गोंधळ; सर्व्हर डाऊन आणि तांत्रिक अडचणींनी महिला त्रस्त
माझी लाडकी बहीण’ ई-केवायसीची मुदत वाढली
सोलापूर : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ई-केवायसीची १८ नोव्हेंबरपर्यंतची अंतिम मुदत असली तरी शासनाने ती वाढवल्याने लाभार्थीना दिलासा मिळाला आहे. मात्र मुदतवाढीची माहिती मिळताच शहरातील विविध सेतु, पोस्ट, सीएससी आणि सायबर केंद्रावर महिलांची मोठी गर्दी उसळली आहे.
शहरातील पोस्ट ऑफिस, सेतू सुविधा केंद्र, सीएससी सेंटर आणि सायबर कॅफे येथे महिलांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. लाडक्या बहिणींनी लवकरात लवकर ई-केवायसी पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असल्याने काही केंद्रांवर तासन्तास प्रतीक्षा करावी लागली. अचानक वाढलेल्या गर्दीमुळे सर्व्हर डाऊन होणे, टोकन संपणे, प्रक्रिया विलंबाने होणे यामुळे महिलांत नाराजीही व्यक्त केली जात आहे.
ई-केवायसी करताना महिलांना काही तांत्रिक अडचणींनाही सामोरे जावे लागत आहे. अनेक लाभार्थीनी अर्ज करताना पतीचा किंवा वडिलांचा आधार क्रमांक दिलेला आहे. अशा प्रकरणांमध्ये आता त्या मधल्या नावाचा उल्लेख जुळण्यासाठी संबंधित पुरुष सदस्याचे आधारकार्ड जोडणे अनिवार्य झाले आहे. यामुळे कागदपत्रे मिळविण्यासाठी पुन्हा धावपळ करावी लागत आहे. शिवाय ओळख पडताळणीतील दोन अतिरिक्त प्रश्नांची उत्तरे देताना अनेक लाभार्थी महिला अडचणीत येत असल्याचे चित्र दिसत आहे.
दरम्यान, ई-केवायसीसाठी वाढीव मुदत मिळाल्याने महिलांना काहीसा दिलासा मिळाला असला तरी प्रक्रिया सुरळीत न झाल्याने त्या त्रस्त झाल्याचे चित्र शहरभर पाहायला मिळत आहे. प्रशासनाने अतिरिक्त काउंटर सुरु करावेत, गर्दी नियंत्रणासाठी मार्गदर्शन करावे, अशी मागणी लाभार्थी महिलांकडून होत आहे.