राज्यातील 0.7 दशलक्ष टन खनिजाचा आज ई-लिलाव
पणजी : राज्यातील विविध खाणी तसेच जेटींवर उपलब्ध असलेल्या सुमारे 2 दशलक्ष टन खनिजापैकी 0.7 दशलक्ष टन लोह खनिजाचा आज दि. 30 रोजी ई-लिलाव करण्यात येणार आहे. राज्यातील उत्खनित खनिजाच्या हाताळणीसाठी आतापर्यंत झालेल्या लिलावामधील आज होणारा लिलाव हा 30 वा आहे. केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमाच्या प्लॅटफॉर्मवरून हा लिलाव होणार आहे. वर्ष 2012 मध्ये खाणकामांवर बंदी येण्यापूर्वी उत्खनन झालेल्या व सध्या विविध जेटी आणि खाणींवर उपलब्ध असलेल्या खनिजापैकी 0.7 दशलक्ष टन खनिजाची आजच्या ई-लिलावाच्या माध्यमातून विक्री करण्यात येणार आहे. ई-लिलावात भाग घेणारी कंपनी किंवा आस्थापनास ‘जसे आहे, जेथे आहे’ या तत्त्वावर सदर खनिज ताब्यात घ्यावे लागणार आहे. सदर खनिजमाल एखादी जेटी वा खाण किंवा भूखंडांवर स्थित आहे. तसेच ते वेगवेगळ्या स्वऊपात आणि प्रक्रिया, विनाप्रक्रिया अवस्थेत किंवा त्यांच्या मिश्रणाच्या स्वरूपात असू शकतो, असे खाण खात्याने स्पष्ट केले आहे.