उत्तर विभाग जिल्ह्यांसाठी ‘ड्युटी मीट’चे आयोजन
पोलीस आयुक्त कार्यक्षेत्रांचा समावेश : आज समारोप
बेळगाव : बेळगाव उत्तर विभागातील विविध जिल्हे, बेळगाव आणि हुबळी-धारवाड पोलीस आयुक्त कार्यक्षेत्रातील अधिकाऱ्यांसाठी सोमवारी पोलीस मुख्यालयात ‘ड्युटी मीट’ आयोजिण्यात आली होती. मंगळवारी या ‘ड्युटी मीट’चा समारोप होणार असून या कार्यक्रमात सात जिल्ह्यांतील अधिकारी व पोलीस सहभागी झाले आहेत. पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे, जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद, कायदा व सुव्यवस्था विभागाचे पोलीस उपायुक्त नारायण बरमणी, अतिरिक्त जिल्हा पोलीसप्रमुख रामगोंडा बसरगी, विधिविज्ञान प्रयोगशाळेचे संचालक प्रवीण संगनाळमठ यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ‘ड्युटी मीट’ला चालना देण्यात आली.
उत्तर विभागातील अधिकारी व पोलिसांसाठी गुन्हे तपास व आधुनिकता आदी विषयांवर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. उत्तर विभागातील बेळगाव व हुबळी-धारवाड पोलीस आयुक्त कार्यक्षेत्र, विजापूर, धारवाड, गदग व बेळगाव जिल्हा पोलीस श्वानपथकातील अठरा प्रशिक्षित श्वानांनीही या ‘ड्युटी मीट’मध्ये भाग घेतला आहे. सोमवारी पोलीस परेड मैदानावर श्वानपथकाची प्रात्यक्षिके दाखविण्यात आली. गुन्ह्यांचा तपास व स्फोटकांच्या तपासात श्वानपथकांची भूमिका यावर प्रात्यक्षिके दाखविण्यात आली. मंगळवारी बेळगाव उत्तर विभागाचे पोलीस महानिरीक्षक चेतनसिंग राठोड यांच्या उपस्थितीत या ‘ड्युटी मीट’चा समारोप होणार आहे.