For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कॅम्पमधील मुख्य रस्त्यावर धुळीचे साम्राज्य

10:46 AM Jan 15, 2024 IST | Tarun Bharat Portal
कॅम्पमधील मुख्य रस्त्यावर धुळीचे साम्राज्य
Advertisement

बरेच दिवस काम सुरू असल्याने व्यापारावर परिणाम : जलवाहिन्यांच्या कामानंतर डांबरीकरण करण्याची मागणी

Advertisement

बेळगाव : कॅम्प परिसरात एल अँड टी कंपनीकडून भूमिगत जलवाहिन्या घालण्यात आल्या. परंतु, जलवाहिन्या घातल्यानंतर खोदाई करण्यात आलेल्या चरी माती घालून तशाच ठेवण्यात आल्या आहेत. यामुळे हायस्ट्रीट परिसरात धुळीचे साम्राज्य पसरले असून व्यापाऱ्यांना या धुळीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे एल अँड टी कंपनीने या ठिकाणी डांबरीकरण करण्याची मागणी केली जात आहे. शहरातील पाणीपुरवठा सुलभ व्हावा यादृष्टीने एल अँड टी कंपनीकडून जलवाहिन्या घातल्या जात आहेत. महानगरपालिकेच्या व्याप्तीबरोबरच दोन महिन्यांपूर्वी कॅन्टोन्मेंट भागामध्ये जलवाहिन्या घालण्याचे काम सुरू झाले. रामघाट रोड, हायस्ट्रीट रोड, धोबीघाट रोड यासह इतर भागांमध्ये जलवाहिन्या घालण्यासाठी खोदाई करण्यात आली. विशेषत: हायस्ट्रीट हा परिसर कॅम्पमधील मुख्य बाजारपेठेचा परिसर म्हणून ओळखला जातो. परंतु, बरेच दिवस हे काम सुरू राहिल्याने याचा परिणाम व्यापारावर झाला. जलवाहिन्या घातल्यानंतर चरी भरण्यासाठी लालमाती ओतण्यात आली. महिना उलटला तरी अद्याप या मातीवर दगड घालून काँक्रिटीकरण करण्यात आलेले नाही. यामुळे आजूबाजूच्या दुकानांमध्ये धुळीचे थर साचत आहेत. याचा परिणाम खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या व्यवसायांवर सर्वाधिक होताना दिसत आहे. काही दुकानदारांनी प्लास्टिकची आवरणे बसवून घेतली आहेत. त्यामुळे एल अँड टी कंपनीकडे डांबरीकरण करण्याची मागणी केली जात आहे.

अनेक ठिकाणी कामे अर्धवट असल्याने धोका

Advertisement

कॅम्प परिसरात जलवाहिन्या घालण्याचे सुरू असलेले काम अर्धवट स्थितीत आहे. रामघाट रोडवरून दररोज हजारो नागरिक ये-जा करतात. बेळगावसह महाराष्ट्रातील नागरिकांना शहरात येण्यासाठी हा रस्ता उपयुक्त ठरतो. परंतु, शंभू जत्तीमठाच्या शेजारी जलवाहिन्या घालण्यासाठी खोदाई करण्यात आलेल्या ठिकाणी काम अर्धवट स्थितीत आहे. त्यामुळे बाजूला बॅरिकेड्स लावून तसेच ठेवण्यात आले आहेत. रात्रीच्यावेळी अंधारामध्ये बॅरिकेड्स दृष्टीस न पडल्यास मोठा अनर्थ घडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

Advertisement
Tags :

.