ऐतिहासिक आचरा संस्थानात रंगला शाही थाटात शिवलग्नसोहळा
आचरा प्रतिनिधी
ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या आचरा येथील संस्थानी थाटासाठी प्रसिध्द असणाऱ्या इनामदार श्री देव रामेश्वर संस्थानच्या दसरोत्सवाची शनिवारी सायंकाळी शाही थाटात सांगता झाली. सायंकाळी तोफांच्या व बंदुकीच्या आतषबाजीनंतर श्री देव रामेश्वराचे तरंग आपल्या शाही लवाजम्यासह फुरसाई मंदिर येथे शिवलग्न सोहळ्यासाठी दाखल झाले होते. शिवलग्न कार्यक्रम पार पडल्या नंतर हजारो भाविकांनी सोन्याचे प्रतीक मानलेल्या आपट्याची पाने सोने म्हणून लुटली. श्री देव रामेश्वराच्या शाही दसरोत्सवास मुंबई ,कराड, गोवा, पुणे, कोल्हापुर, बेळगाव,गोकर्ण येथुन आचरा गावचे मुळ रहिवासी दाखल झाले होते. श्री देव रामेश्वराची पिंडी यावेळी पंचमुखी महादेवाच्या स्वरूपात सजविण्यात आली होती. हे अनोखे 'श्री ' चे रूप पाहण्याचा दुर्मिळ आनंद लुटण्यासाठी ऐतिहासिक रामेश्वर मंदीरात भाविकांची रीघ लागली होती .शनिवारी सकाळ पासून आचरा गावच्या माहेरवाशीनी फुरसाई देवीची खणानारळाने ओटी भरण्यास दाखल झाल्या होत्या. श्री देव रामेश्वराचे दर्शन घेऊन माहेरवाशीणी श्री देवी फुरसाई मंदीराकडे ओट्या भरण्यासाठी जात होत्या. या कार्यक्रमाला महिला भाविकांची लक्षणीय उपस्थिती होती. या दसरोत्सवाच्या कार्यक्रमास हजारो भाविकांनी उपस्थिती दर्शविली होती.