केंद्राकडून राज्यातील शेतकऱ्यांना दसरा भेट
पाच धान्ये आधारभूत दराने खरेदी करण्यास मंजुरी
प्रतिनिधी/ बेंगळूर
अतिवृष्टीमुळे राज्यातील काही भागात पिकांची हानी झाली आहे. त्यामुळे केंद्र सरकारने राज्यातील शेतकऱ्यांच्या मदतीसाठी धाव घेतली आहे. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या विनंतीवरून केंद्र सरकारने राज्यातील शेतकऱ्यांकडून पाच धान्ये आधारभूत दराने खरेदी करण्यास मंजुरी दिली आहे.
2025-26 या सालातील खरीप हंगामात पिकविलेले मूग, उडीद, भूईमूग, सोयाबीन आणि सूर्यफूल बिया अशी पाच धान्ये केंद्राच्या आधारभूत दराने खरेदी करण्याचे निर्देश राज्य सरकारला देण्यात आले आहेत. केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंग चौहान यांनी वैयक्तिकरित्या केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांना पत्र पाठवून ही माहिती दिली आहे. हे पत्र जोशी यांनी आपल्या सोशल मीडिया अकौंट ‘एक्स’वर पोस्ट केले आहे.
केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या विनंतीची दखल घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तत्काळ राज्यातील शेतकऱ्यांच्या मदतीसाठी हात पुढे केला आहे. तातडीने शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी कार्यवाही करण्यास सांगितले आहे. त्याचप्रमाणे केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंग चौहान यांनीही माझ्या विनंतीला अनुसरून राज्यातील शेतकऱ्यांकडून आधारभूत दराने धान्ये खरेदी करण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले आहेत, अशी माहिती प्रल्हाद जोशी यांनी दिली आहे.
जिल्हानिहाय खरेदी केंद्रे सुरू करण्याची मागणी
केंद्र सरकारने कर्नाटकातील शेतकऱ्यांसाठी आधारभूत दराने पाच धान्ये खरेदी करण्यास राज्य सरकारने त्वरित कार्यवाही करावी. राज्यभरात जिल्हानिहाय खरेदी केंद्रे उघडून धान्ये खरेदी प्रक्रियेला चालना द्यावी, अशी मागणी केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिली आहे. कर्नाटकातील शेतकऱ्यांची समस्या जाणून घेऊन त्यांच्या मदतीसाठी धाव घेतल्याबद्दल पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंग चौहान यांचे आभार मानत असल्याचेही जोशी यांनी म्हटले आहे.
शेतकऱ्यांचे हित जोपासण्यासाठी आणि त्यांना स्थिर व शाश्वत उत्पन्न मिळवून देण्यासाठी भारत सरकार कटिबद्ध आहे. त्यामुळेच धान्ये आधारभूत दराने खरेदी करण्यास मंजुरी देण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कोणते धान्य किती खरेदी करणार?
केंद्र सरकारने 2025-26 या वर्षात आधारभूत दर योजनेंतर्गत कर्नाटकातून 38 हजार मेट्रिक टन मूग, 60,810 मे. टन उडीद, 15,650 मे. टन सूर्यफूल बिया, 61,148 मे. टन भूईमूग आणि 1,15,000 मे. टन सोयाबिन खरेदी करण्यास मंजुरी दिली आहे.