तालुक्यात दसरोत्सव-सीमोल्लंघन पारंपरिक पद्धतीने
गावागावांमध्ये पालखी सोहळे : सीमोल्लंघनाला भाविकांची गर्दी : सोने लुटून सोनं घ्या सोन्यासारखे रहा..च्या दिल्या शुभेच्छा
वार्ताहर/किणये
तालुक्यात गुरुवारी विजयादशमी दसरोत्सव व सीमोल्लंघन मोठ्या उत्साहात व पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. गावागावातील ग्रामदैवतांच्या व विविध देवदेवतांच्या पालख्यांची मिरवणूक मोठ्या जल्लोषात काढण्यात आली. या मिरवणुकीत गुलाल व भंडाऱ्याची उधळण करण्यात आली. सीमेवरती सीमोल्लंघन करण्यात आले. यावेळी भाविकांनी आपट्याची पाने एकमेकांना देऊन सोनं घ्या सोन्यासारखे रहा... अशा शुभेच्छा देत परंपरा जपली. ग्रामीण भागात गावागावांमध्ये विजयादशमी व सीमोल्लंघन वेगवेगळ्या पद्धतीने साजरी करण्याची परंपरा आहे.
या सणानिमित्त मंदिरांमध्ये दर्शनासाठी व नारळ वाढविण्यासाठी भक्तांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून आली. सीमेवरती सोने लुटण्याचा कार्यक्रम झाला. तालुक्याच्या गावागावांमधील ग्रामदैवत व इतर मंदिरांमध्ये नवरात्र उत्सवानिमित्त घटस्थापना करण्यात आली. घटस्थापनेपासून रोज मंदिरात काकड आरती, भजन, प्रवचन, कीर्तन निरूपण, जागर भजन असे आध्यात्मिक कार्यक्रम करण्यात आले. तसेच नवरात्रोत्सवानिमित्त मंदिरांमध्ये ज्योत अखंड तेवत ठेवण्यात आली होती. काही गावातील तरुण मंडळांच्या वतीने घटस्थापनेच्या दिवशी दुर्गामाता मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली होती. यासाठी विशेष मंडपाची व्यवस्था केली होती.या मंडपात रोज सायंकाळी महाआरती तसेच आध्यात्मिक व मनोरंजनाचे कार्यक्रम झाले.
खंडेनवमी पूजन
बुधवारी खंडेनवमी पूजन करण्यात आले. यावेळी शेतकऱ्यांनी आपल्या शेत शिवारात काम करत असलेल्या शस्त्रांची विशेष पूजा केली. तसेच देव देवतांसमोर ऊस ठेवून मंदिरांमध्येही पूजा करण्यात आली. ग्रामीण भागातील लहान मोठ्या कारखानदारांनी आपल्या मशिनरींची पूजा केली. नावगे गावात बुधवारी खंडेनवमी पूजन झाले. गुरुवारी दुपारी विजयादशमीनिमित्त भैरवनाथ मंदिर येथे पूजा करून घाटावरचा नारळ झाडावरती बांधण्यात आला व त्याला निशाणी लावून भक्तांनी बंदुकीच्या साह्याने फोडले. ही परंपरा आजही जपण्यात आली आहे. त्यानंतर रामलिंग मंदिर परिसरात भक्तांनी नारळ उडविले हे नारळ घेण्यासाठी भक्तांची मोठ्याप्रमाणात गर्दी दिसून आली. गावचे इनामदार जयसिंग देसाई यांच्या हस्ते पालखीचे पूजन करण्यात आले. त्यानंतर पारंपरिक वाद्यांच्या गजरात मंदिराभोवती पालखीची पाचवेळा प्रदक्षिणा झाली. त्यानंतर ही पालखी सीमेकडे रवाना झाली. सीमेवरती आपट्याच्या झाडाच्या ठिकाणी पूजा करून तेथून आपट्याची पाने गावात आणण्यात आली. पालखी महालक्ष्मी मंदिर येथे आल्यानंतर गाऱ्हाणा होऊन सांगता झाली
खादरवाडीत भाविकांची अलोट गर्दी..
खादरवाडी गावात विजयादशमीनिमित्त ब्रह्मलिंग मंदिरात दर्शनासाठी व सीमोल्लंघनासाठी भक्तांची अलोट गर्दी दिसून आली. गुरुवारी सकाळी ब्रह्मलिंग मंदिरात पालखी पूजन झाल्यानंतर पालखीला ओटी भरण्याचा कार्यक्रम झाला. मंदिरासमोर नारळ उडविण्यात आले. त्यानंतर पालखीला सुरुवात करण्यात आली ही पालखी जैतनमाळ येथील सीमेवरती आली. याच ठिकाणी मजगाव येथील पालखीसुद्धा आली होती. त्यानंतर खादरवाडी गावातील पालखी बनी भरम मंदिर येथे आली. त्या ठिकाणी आपट्याची पाने एकमेकांना वाटण्यात आली. रात्री ही पालखी ब्रह्मलिंग मंदिराजवळ आली.
वाघवडे येथे गुलालाच्या उधळणीत पालखी मिरवणूक
वाघवडे गावात गुरुवारी गुलालाची उधळण करत व पारंपरिक वाद्याच्या गजरात मोठ्या जल्लोषात पालखी मिरवणूक काढण्यात आली. दुपारी चव्हाटा देवस्थान येथून या पालखीला सुरुवात झाली. प्रारंभी गाऱ्हाणा घालण्यात आला. देवपूजा करून पालखीला ओटी भरण्याचा कार्यक्रम झाला. पालखी गावातील रवळनाथ व कलमेश्वर मंदिर परिसरात गेली. त्या ठिकाणी पालखीचे पूजन करण्यात आले. या भक्तांच्या डोक्यावरून पालखी फिरविण्यात आली. याच ठिकाणी सीमोल्लंघन झाले.
मंडोळीत विजयादशमी
विजयादशमीनिमित्त शेतकरी आपल्या बैलांना मंदिर परिसरात फिरवितात. ही परंपरा आजही जपण्यात आली आहे. गुरुवारी दुपारी पालखीचे पूजन मारुती मंदिर येथे करण्यात आले. ही पालखी बसवाण्णा मंदिर येथे आली. त्या ठिकाणी सीमोल्लंघन झाले. बेळगुंदी येथील शिवाजीनगर येथून पालखीला सुरुवात करण्यात आली. ही पालखी हनुमाननगर येथून संपूर्ण गावभर फिरली व रवळनाथ मंदिर येथे या पालखीची सांगता झाली.
बाळगमट्टी
येथील ब्रह्मलिंग मंदिराच्या परिसरात सीमोल्लंघन कार्यक्रमासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून आली. या ठिकाणी मच्छे येथील पालखी आली होती. याचबरोबर बहाद्दरवाडी, किणये, देसूर, झाडशहापूर, संतिबस्तवाड रणकुंडये, कर्ले, किणये, बामणवाडी, जानेवाडी, बिजगर्णी, कावळेवाडी, बेळवट्टी, सोनोली, यळेबैल, बोकनुर, राकसकोप परिसरात पारंपरिक पद्धतीने सीमोल्लंघन करण्यात आले.