उचगाव परिसरात दसरोत्सव उत्साहात
वार्ताहर /उचगाव
उचगाव आणि परिसरातील कल्लेहोळ, सुळगा, गोजगे, तुरमुरी, कोनेवाडी, बसुर्ते, बेनकनहळ्ळी, बेकिनकेरे,अतिवाड गावामधून दसरोत्सव मोठ्या उत्साही वातावरणात पार पडला. उचगावमधील जागृत देवस्थान मळेकरणी देवीच्या आमराईतील मंदिरात नवरात्र उत्सवात सकाळी, सायंकाळी देवीची महाआरती भाविकांच्या उपस्थितीत पार पडली. शनिवार दि. 12 रोजी गांधी चौकातील बाळासाहेब देसाई यांच्या वाड्यातून मानाची पालखी सोहळ्याला सुऊवात झाली. यावेळी देसाई भाऊबंद कमिटीचे सर्व पदाधिकारी व ग्रामस्थ यांनी पालखी सोहळ्यात आपला सहभाग दर्शवला होता. याप्रसंगी बाळासाहेब देसाई, डी बी. देसाई, गणेश दूध संकलन केंद्राचे प्रोप्रायटर उमेश उर्फ प्रवीण मोतीराम देसाई यासह अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होती. हा पालखी सोहळा गणपत गल्लीतील सीमेपर्यंत येऊन पुढे मधली गल्ली, लक्ष्मी गल्ली, रवळनाथ गल्ली, माऊती गल्ली, सुरवीर गल्ली,कचेरी गल्ली व गणपत गल्ली या प्रमुख मार्गावरून फिरवून सोहळ्याचा सांगता समारंभ मळेकरणी देवीच्या आमराईमध्ये करण्यात आली.