मजगाव येथील दसरोत्सव उत्साहात
वार्ताहर/मजगाव
येथील जागृत देवस्थान श्री ब्रम्हलिंग व कलमेश्वर मंदिरासमोर गुरुवारी सायंकाळी यात्रा भरली होती. यावेळी पारंपरिक पद्धतीने देवांच्या मूर्तींना पोलीस पाटलांच्या विहिरीवर स्थान घालून तेथे पूजन करून वाजतगाजत मंदिरामध्ये पालखी येते व या ठिकाणी पालखी सजवून देवांची मूर्ती बसवून गाऱ्हाणे कार्यक्रम झाला. त्यानंतर मंदिराच्या पटांगणात उंच नारळ उडविण्याची प्रथा आहे. नारळ उंच उंच उडविण्यात व ते नारळ जिंकण्यासाठी, मिळविण्यासाठी भाविकांची धडपड सुरू असते. कार्यक्रम पाहण्यासाठी भाविक शेकडोच्या संख्येने सहभागी होतात. यानंतर सीमेल्लंघनासाठी पालखी निघते. त्यावेळी हर हर महादेव, श्री ब्रम्हलिंग महाराज की जय, अशा घोषणा देत पालखी मजगावच्या सीमेवरुन सुमारे 10 कि.मी. प्रवास करून शेवटी ब्रम्हनगर येथील श्री बन्ना भरमाप्पा देवालयासमोर सोने लुटण्याचा कार्यक्रम मोठ्या हौसेने पार पाडण्यात आला. यानंतर शांतपणे पालखी व भक्त पुन्हा श्री ब्रम्हदेव मंदिराकडे जावून पूजा करून आपापल्या घरी परतले.