कडोली येथील दसरोत्सवाला अलोट गर्दी
लाखो भाविकांच्या उपस्थितीत विविध वाद्यांच्या गजरात तरुणाई बेभान होऊन थिरकली : पोलिसांचे शिस्तबद्ध नियोजन
वार्ताहर/कडोली
सुमारे एक लाख भाविकांच्या उपस्थितीत कडोली येथे शनिवारी श्री कलमेश्वर देवालयाचा ऐतिहासिक दसरोत्सव मोठ्या उत्साहात आणि शांततेत पार पडला. विविध वाद्यांच्या गजरात तरुणाई बेभान होऊन थिरकली. सालाबादप्रमाणे येथील जागृत देवस्थान श्री कलमेश्वर देवालयाचा दसरोत्सव पारंपरिक पद्धतीने किरकोळ वादावादी वगळता थाटामाटात पार पडला. यावर्षी वाद्यांची संख्याही जास्त होती. त्यामुळे संपूर्ण बेळगाव शहर आणि तालुक्यातून मोठ्या संख्येने तरुणाईचे पाय कडोली गावाकडे वळले होते. पोलिसांचे शिस्तबद्ध नियोजन झाल्यामुळे कोणतीही मोठी अनुचित घटना घडली नाही.पहाटे श्री कलमेश्वर देवालयात कळस चढवून झाल्यानंतर काकडारती-पूजा पार पडल्यानंतर भरयात्रेला सुरुवात झाली.
ढोल, ताशा, सनईच्या गजरात प्रथमता बैलजोडींची मिरवणूक पार पडली. झुंज आणि शिवमुद्रा ढोल, ताशा पथकाने ढोल-ताशांच्या गजराने सर्वांना मोहून टाकले. गेल्या काही वर्षात बंद पडलेली लेझीम यावेळी हिरकणी पथकाने सादर करून पुन्हा पारंपरिक पद्धतीची आठवण करून दिली. या लेझीमद्वारे विविध कला सादर करून सर्वांना मोहून टाकले. तर प्रत्येक गल्लीतील युवक मंडळाने विविध वाद्यांना आमंत्रण करून तरुणाईला थिरकण्यास भाग पाडले. यावेळी तरुणांची संख्या जास्त होती. मंदिराच्या आवारात खेळण्यांची दुकाने थाटण्यास देवस्थान पंचकमिटीने परवानगी दिली होती. त्यामुळे भाविकांनाही याची सोय झाली होती. सायंकाळी देवस्थान पंचकमिटी, हक्कदारांतर्फे विडे काढणे, सवाद्य तरंगे आणण्याच्या कार्यक्रमानंतर देवालयाला गाऱ्हाणे घालण्यात आले. त्यानंतर आकर्षकरित्या बांधलेली केळीची बन्नी पाडण्यात आली. त्यानंतर देवस्थानच्या पालख्या सोने लुटण्यासाठी गावच्या सिमेकडे मार्गस्थ झाल्या.
पोलीस अधिकाऱ्यांचा सत्कार
दसरा उत्सव बंदोबस्तासाठी एएसआय, एक पोलीस निरीक्षक, पाच उपपोलीस निरीक्षक, राज्य राखीव पोलीस दलाचे असे 200 पोलीस नियुक्त करण्यात आले होते. या दसरा उत्सवात थिरकण्यासाठी मोठ्या संख्येने तरुणाई एकवटली होती. या सर्वांना नियंत्रणात आणण्यासाठी ग्रामीण एएसआय एन. गंगाधर, पोलीस निरीक्षक सुरेश शिंगी आणि इतर पोलीस अधिकाऱ्यांनी परिश्रम घेऊन यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी मदत केली. याबद्दल देवस्थान पंचकमिटीतर्फे श्रीफळ व पुष्पहार घालून सत्कार केला.