यात्राकाळात पार्किंग व्यवस्था-गैरकृत्यांवर लक्ष ठेवणार
गुंजेनहट्टी येथील श्री होळी कामाण्णा देवालयाच्या यात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पदाधिकाऱ्यांची पूर्वतयारी संदर्भात बैठक
वार्ताहर /कडोली
दि. 25 मार्च धूलिवंदनदिवशी गुंजेनहट्टी येथील श्री होळी कामाण्णा देवालयाच्या यात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पूर्वतयारी संदर्भात यात्रा कमिटी, पोलीस खाते आणि ग्रामपंचायतीच्यावतीने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीत रस्त्यांची दुरुस्ती, पिण्याच्या पाण्याची सोय, रहदारी आणि पार्किंग व्यवस्था तसेच विद्युत पुरवठ्यासंदर्भात प्रामुख्याने चर्चा करण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी बाळू पाटील होते. प्रारंभी अॅड. शाम पाटील यांनी प्रास्ताविक केल्यानंतर यात्रा कमिटीच्यावतीने उपस्थित मान्यवर केपीसीसी सदस्य मलगौडा पाटील, काकती पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक उमेश एम., एएसआय बसवाणी लमाणी, ग्रा. पं. अध्यक्ष सागर पाटील, उपाध्यक्षा दीपा मरगाळे, जि. पं. माजी उपाध्यक्ष अरुण कटांबळे, काकती येथील हेस्कॉमचे अधिकारी विनय बकरी, ग्रा. पं. सदस्य आदींचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
प्रथमत: रहदारी आणि पार्किंगबद्दल चर्चा करण्यात आली. कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोवा येथून या श्री होळी कामाण्णा देवालयाच्या यात्रोत्सवाला लाखो भाविक येत असतात. त्यामुळे रहदारी आणि पार्किंग व्यवस्था कोलमडत आहे. याची व्यवस्था चांगल्याप्रकारे व्हावी, रहदारीचा भाविकांना कोणताही त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी. गैरकृत्य करणाऱ्यांवर लक्ष ठेवले जावे, अशाप्रकारचे निवेदन पोलीस निरिक्षक उमेश एम. यांना यात्रा कमिटीच्यावतीने देण्यात आले. त्यानंतर सुरळीत विद्युत पुरवठ्यासाठी कायमस्वरुपी उच्च दाबाचा ट्रान्स्फॉर्मर बसवावा, असे निवेदन यावेळी हेस्कॉमच्या अधिकाऱ्यांना देण्यात आले. तर पाण्याची व्यवस्था, स्वच्छता मोहीम आणि रस्त्याची दुरुस्ती तातडीने करावी, अशाप्रकारचे निवेदन ग्रा. पं. अध्यक्ष सागर पाटील यांनाही देण्यात आले.
यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री व जिल्हा पालकमंत्री सतीशअण्णा जारकीहोळी यांचे सचिव मलगौडा पाटील यांनी, यात्रेपूर्वी गावातील प्रमुख रस्त्यांचे काँक्रीटीकरण करण्यात येईल. यात्राकाळात कोणतीही अडचण निर्माण होणार नाही यासाठी संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांना पूर्वसूचना दिली जाईल, असे आश्वासन दिले. यावेळी ग्रा. पं. सदस्य राजू मायाण्णा यांनी यात्रेसंदर्भात माहिती दिली. अरुण कटांबळे, गौडाप्पा पाटील यांनीही मार्गदर्शन केले. याप्रसंगी पोलीस निरिक्षक उमेश एम. यांनी, पार्किंग व्यवस्थेचे नियोजन करून रहदारी सुरळीत ठेवली जाईल. यात्रेवर पोलीस खाते लक्ष ठेवून यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी मदत करेल, असे आश्वासन दिले. किरण पाटील यांनी आभार मानले.