धर्म रक्षणासाठी दुर्गामाता दौड!
हभप शिरीष मोरे महाराज देहुकर : दौडची उत्साहात सांगता : तरुणाईचा मोठा सहभाग
बेळगाव : अखंड भारत वर्षातील सर्वात मोठी दुर्गामाता दौड बेळगावात निघते, याचा सर्वांनाच अभिमान आहे. संस्कृती लोप पावत चालली आहे. अशा काळात हिंदू धर्म रक्षणासाठी दुर्गामाता दौड सुरू आहे. ही आपल्या सर्वांसाठी स्फूर्तिदायी गोष्ट आहे, असे उद्गार संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांचे 11 वे वंशज हभप शिरीष मोरे महाराज देहुकर यांनी काढले.
शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आयोजित दुर्गामाता दौडची शनिवारी धर्मवीर संभाजी चौक येथे सांगता झाली. यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर शिवव्याख्याते सौरभ कर्डे, कर्नाटक प्रांतप्रमुख किरण गावडे, जिल्हा प्रमुख विश्वनाथ पाटील, शहर प्रमुख अनंत चौगुले, तालुका प्रमुख परशराम कोकितकर आदी उपस्थित होते. हभप शिरीष मोरे महाराज पुढे म्हणाले, ज्ञानोबा-तुकोबांचा वारकरी आणि छत्रपती शिवरायांचा धारकरी हा एकच आहे. पहिला हिंदू राजा म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी अफाट कार्य केले आहे, असे सांगत हिंदू समाजावर होणाऱ्या अत्याचारांबाबत विवेचन केले.
यावेळी शिवव्याख्याते सौरभ कर्डे यांनी हिंदवी स्वराज्य खडा पहारा याबाबत धारकऱ्यांना मार्गदर्शन केले. किरण गावडे यांनीही मागील 25 वर्षांतील दुर्गामाता दौडचा आढावा घेतला. दौडमधील वाढती संख्या लक्षात घेऊन पुढील वर्षापासून दौडमध्ये काही बदल करण्यात येतील, असे स्पष्ट केले. दहाव्या दिवसाच्या दौडची मारुती गल्ली मारुती मंदिर येथून सुरुवात झाली. हभप शिरीष मोरे महाराज, शिवव्याख्याते सौरभ कर्डे यांच्या हस्ते आरती करण्यात आली. प्रेरणामंत्र म्हणून दौडला चालना देण्यात आली. यावेळी वकील शामसुंदर पत्तार उपस्थित होते.
मारुती मंदिर येथून प्रारंभ झालेली दौड नरगुंदकर भावे चौक, महालक्ष्मी मंदिर, बसवाण गल्ली, देशपांडे गल्ली, बसवाण्णा मंदिर, अशोक चौक, रामलिंगखिंड गल्ली, टिळक चौक, रिझ टॉकीज रोड, कोनवाळ गल्ली, अनसूरकर गल्ली, हुतात्मा चौक, रामदेव गल्ली, केळकर बाग, समादेवी गल्ली, संयुक्त महाराष्ट्र चौक, नार्वेकर गल्ली, शनिवार खूट, काकतीवेस रोड, गणाचारी गल्ली, गवळी गल्ली, गोंधळी गल्ली, कंग्राळ गल्ली, काकतीवेस रोड, कंग्राळ गल्ली, सरदार्स ग्राऊंड रोड, कॉलेज रोड, चन्नम्मा सर्कल, काळी आमराई, कॉलेज रोड, गोंधळी गल्ली, समादेवी गल्ली, कॉलेज रोड येथून धर्मवीर संभाजी चौक येथे आली. मुख्य कार्यक्रमानंतर आरती आणि ध्येयमंत्राने सांगता झाली.
शेवटच्या दिवशी शनिवारी दुर्गामाता दौडचे ठिकठिकाणी जल्लोषी स्वागत करण्यात आले. भगवे झेंडे, भगव्या पताका आणि भगव्या फुग्यांनी वातावरण भगवेमय झाले होते. दौड मार्गावर चैतन्याचे वातावरण होते. शहरातील मुख्य रस्त्यांवरच दौडचे उत्साहात स्वागत करण्यात आले. बाल मावळे आणि महिलांनीही विविध देखावे सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
धारकऱ्यांची संख्या लक्षणीय
शनिवारी शेवटचा दिवस असल्याने दौडमध्ये सहभागी होणाऱ्या धारकऱ्यांची संख्या मोठी होती. ग्रामीण भागातूनही मोठ्या संख्येने धारकरी सहभागी झाले होते. त्यामुळे शेवटच्या दिवशीची दौड अविस्मरणीय ठरली. ही दौड प्रेरणा, ऊर्जा आणि स्फूर्ती देणारी असल्याचे धारकऱ्यांतून सांगण्यात येत होते.
गवळी गल्ली येथे पावनखिंडचा देखावा
शनिवारी गवळी गल्ली येथे पावनखिंडचा देखावा सादर करण्यात आला. पावनखिंडीतील पराक्रम आणि थरारक या ठिकाणी दाखविण्यात आला. या देखाव्याने साऱ्यांचे लक्ष वेधले. शिवाय पावनखिंडीच्या पराक्रमाचा देखावा सगळ्यांसमोर सादर केला.