चैतन्यमयी वातावरणात दुर्गामाता दौड
पहिल्याच दिवशी हजारो शिवभक्तांची उपस्थिती : जागोजागी जल्लोषात स्वागत
प्रतिनिधी/ बेळगाव
नवरात्रोत्सवात देशभक्तीचे स्फुल्लिंग चेतवणाऱ्या दुर्गामाता दौडला सोमवारपासून चैतन्यमयी वातावरणात सुरुवात झाली. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान बेळगाव विभागाच्यावतीने काढण्यात आलेल्या दुर्गामाता दौडला पहिल्याच दिवशी हजारोंच्या संख्येने शिवभक्त उपस्थित होते. दुर्गादेवीचा जागर करत शिवशंभूचा गजर शिवभक्तांनी केला. दौडसाठी शहर परिसरात भगव्या पताका, भगवे झेंडे तसेच दौडच्या स्वागतासाठी करण्यात आलेले देखावे लक्षवेधी ठरले.
पहिल्या दिवशीच्या दौडला छत्रपती शिवाजी उद्यान येथून सुरुवात झाली. भल्या पहाटे हजारोंच्या संख्येने शिवभक्त शिवाजी उद्यान परिसरात उपस्थित होते. भगवे फेटे, पांढरे सदरे व टोप्या घातलेले धारकरी सर्वत्र दिसून येत होते. प्रेरणा मंत्र म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे विधिवत पूजन करण्यात आले. परंपरेप्रमाणे पहिल्या दिवशी छत्रे गुरुजी व त्यांच्या सहकाऱ्यांच्या उपस्थितीत पूजन करण्यात आले. ध्वज चढवून दौडला चालना देण्यात आली.
कर्नाटक प्रांतप्रमुख किरण गावडे यांनी उपस्थित शिवभक्तांना दौडविषयी मार्गदर्शन केले. पहाटेच्या थंडीत ध्वज घेऊन धारकरी दौडच्या मार्गावर निघाले. दौडच्या मार्गावर भल्या मोठ्या रांगोळ्या तसेच फुलांनी स्वागत करण्यात आले. अनेक ठिकाणी स्वागत कमानी तसेच देखावे सादर करण्यात आले होते. स्वागतासाठी महिला तसेच बालचमू मोठ्या संख्येने उपस्थित असल्याचे दिसून आले.
हुलबत्ते कॉलनी, शास्त्राrनगर, गुड्सशेड रोड, महाद्वार रोड, समर्थनगर, तानाजी गल्ली, एसपीएम रोडमार्गे कपिलेश्वर मंदिर येथे सांगता झाली. शंकर भातकांडे यांच्या हस्ते ध्वज उतरविण्यात आला. यावेळी पुरुषांसोबत महिलांचीही संख्या लक्षणीय असल्याचे दिसून आले.
बुधवार दि. 24 रोजीचा दौडचा मार्ग
शिवतीर्थ येथून दुर्गामाता दौडला प्रारंभ होणार असून काँग्रेस रोड, ग्लोब टॉकीज रोड, इंडिपेंडंट रोड, हाय स्ट्रीट, चर्च स्ट्रीट, कल्याणी स्वीटमार्ट रोड, गवळी गल्ली, कोर्ट स्ट्रीट, वेस्ट स्ट्रीट, हाय स्ट्रीट, कोंडप्पा स्ट्रीट, चर्च स्ट्रीट, मद्रास स्ट्रीट, कुंतीमाता मंदिर, फीश मार्केट, तेलगू कॉलनी, के. टी. पुजारी दुर्गामाता मंदिर, खानापूर रोड, धर्मवीर संभाजी चौक, जत्ती मठ येथील दुर्गामाता मंदिरात सांगता होणार आहे.