धामणे परिसरात दुर्गामाता दौड
धामणे : शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे काढण्यात येणाऱ्या दुर्गामाता दौडची सुरूवात धामणे, नंदिहळ्ळी, राजहंसगड, तारिहाळ येथे देवदेवतांच्या जयघोषात घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर दि. 22 रोजी उत्साहात सुरूवात झाली. धामणे विभाग शिवप्रतिष्ठानतर्फे पहाटे 5.30 वाजता येथील कलमेश्वर मंदिरात पूजन करून आरती झाली. त्यानंतर यल्लाप्पा जायाण्णाचे यांच्या हस्ते ध्वजपूजन झाले व प्रेरणामंत्र झाल्यानंतर हरहर महादेवच्या जयघोषात दौडला सुरूवात झाली. दौडचे ठिकठिकाणी आरती ओवाळून व पुष्पवृष्ठी करून स्वागत करण्यात आले. दौड गावभर फिरुन येथील बसवाण्णा मंदिर आवारात पोहोचली. या ठिकाणी ध्येयंमत्र झाल्यानंतर हणमंत कलकुटी ग्रामीण पोलीस स्थानकाचे बिट हवालदार यांच्या हस्ते ध्वज उतरविण्यात येवून दौडची सांगता झाली. दौडमध्ये धामणे, कुरबरहट्टी, मासगौंडहट्टी, देवगणहट्टी, अवचारहट्टी येथील युवक, युवती मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.