सदाशिवगड येथे दुर्गामाता दौड
कारवार : कारवारपासून जवळच असलेल्या सदाशिवगड येथे नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवारी सकाळी येथे भक्तीमय वातावरणात दुर्गामाता दौड निघाली. येथील सदाशिवगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या प्रसिद्ध दुर्गादेवी मंदिरात दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी लोटत आहे. ओटी भरण्यासाठी, साकडे घालण्यासाठी, नवस फेडण्यासाठी मंदिरात भाविकांची मोठी गर्दी होत आहे. मंदिर उत्सव समितीने दसरा महोत्सवाचे आयोजन केले असून पूजाअर्चा, कीर्तन, दांडियाचे आयोजन करण्यात आले आहे. दसरा महोत्सवाची सांगता विजयादशमी दिवशी होईल.
सदाशिवगड येथील महामाया देवस्थान, चिंचेवाडा येथील शारदांबा देवस्थानात पारंपारिक आणि मोठ्या उत्साही वातावरणात नवरात्रोत्सवाला प्रारंभ झाला आहे. या दोन्ही ठिकाणी दांडियाचे आयोजन करण्यात आले आहे. सदाशिवगडच्या पिंपळकट्टा नवरात्रोत्सव उत्सव समितीतर्फे दुर्गादेवीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. उत्सव समितीचे हे 27 वे वर्ष आहे. सनातन स्वराज्य संघातर्फे सदाशिवगड येथे पाच दिवसीय दुर्गामाता दौडचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवारी पहिल्या दिवशी दुर्गादेवी मंदिर ते महामाया देवस्थानपर्यंत दौडचे आयोजन करण्यात आले होते. उर्वरित दिवसात महामाया देवस्थान ते शारदांबा देवस्थान, शारदांबा देवस्थान ते माजाळी येथील रामनाथ मंदिर, रामनाथ मंदिर ते सातेरी देवस्थान (माजाळी) व सातेरी देवस्थान ते देवती मंदिर असे नियोजन करण्यात आले आहे.