खानापुरात चैतन्यमय वातावरणात दुर्गादौडीची सांगता
तालुक्यात सर्वत्र शिवमय वातावरण, गावोगावी शिवकालीन, ऐतिहासिक देखावे सादर
खानापूर : शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेच्यावतीने तालुक्यात दुर्गामाता दौडीचे आयोजन करण्यात आले होते. गेल्या अकरा दिवसांपासून सुरू असलेल्या दौडीची अभूतपूर्व, चैतन्यमय आणि मंगलमय वातावरणात गुरुवारी सांगता करण्यात आली. तालुक्यात सर्वत्र शिवकालीन वातावरण निर्माण झाले होते. ग्रामीण भागात तसेच रवळनाथ मंदिर परिसरात शिवकालीन तसेच ग्रामीण जीवनावर आधारीत देखावे सादर करण्यात आले होते. यात गावातील महिला, बालके आणि युवकांचा सहभाग मोठ्या प्रमाणात होता. शहरात पहाटे 5.30 वाजता शिवाजी महाराजांच्या मूर्तीला प्रमोद कोचेरी, संजय कुबल, राजू रायका यांच्या हस्ते अभिषेक व पूजा करून दौडीला सुरुवात करण्यात आली.
दसऱ्याची दौडीची सुरुवात शिवस्मारक येथून सुरू झाल्यानंतर ब्रम्ह मंदिरात आरती करण्यात आली. त्यानंतर निंगापूर गल्लीत दौडीचे अभूतपूर्व स्वागत करण्यात आले. त्यानंतर चव्हाटा मंदिरात आरती करण्यात आली. त्यानंतर घोडे गल्लीतून दौड श्री लक्ष्मी मंदिर येथे आल्यानंतर दौडीचे मंदिर कमिटीच्यावतीने स्वागत करण्यात आले. आरती झाल्यानंतर दौड स्टेशनरोड, चिरमुरकर गल्लीतून गुरव गल्लीत येताच गुरव गल्ली आणि रवळनाथ युवक मंडळाच्यावतीने दौडीचे भव्य स्वागत करण्यात आले. सुवासिनीनी ध्वजाला आरती करून स्वागत केले. यानंतर दौड घाडी गल्ली येथून बाजारपेठमार्गे नगारखान्यातून रवळनाथ मंदिर परिसरात दौडीचे आगमन झाले. रवळनाथ मंदिर परिसरात शिवकालीन तसेच ग्रामीण जीवनावर आधारीत देखावे सादर केले होते.
यावेळी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्यावतीने नगरपंचायतीच्या सफाई कामगारांचा गौरव करण्यात आला. यावेळी भाजप नेते संजय कुबल, जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, नामदेव गुरव यांची भाषणे झाली. तर विश्वास किरमिटे आणि कुमारी वेदांती तुकाराम पाटील हिचे शिवचरित्रावर व्याख्यान झाले. यांतर प्रेरणामंत्र होऊन दौडीची सांगता करण्यात आली. तालुक्यात करंबळ, नंदगड, जांबोटी, गुंजी, बेकवाड, कणकुंबी, बिडी, लोकोळी, हलशी यासह ग्रामीण भागातील गावोगावी दौडीची गुरुवारी सांगता करण्यात आली. यावेळी महिला युवकांचा आणि बालकांचा समावेश मोठ्या प्रमाणात होता. गावोगावी ग्रामीण जीवनावरील तसेच ऐतिहासिक, शिवकालीन सजीव देखावे सादर केले होते. त्यामुळे गावात पहाटेच चैतन्यमय वातावरण निर्माण झाले होते. संपूर्ण तालुक्यात चैतन्यमय वातावरणात दौडीची सांगता करण्यात आली.