लॉरेस वर्ल्ड स्पोर्ट्स अवॉर्ड सोहळ्यात डुप्लांटिस, बायल्सला सर्वोच्च सन्मान
वृत्तसंस्था/ माद्रिद
सोमवारी येथे झालेल्या लॉरेस वर्ल्ड क्रीडा पुरस्कार सोहळ्यात स्टार पोल व्हॉल्टर मोंडो डुप्लांटिसला ‘लॉरेस वर्ल्ड स्पोर्ट्समॅन ऑफ द इयर’ म्हणून घोषित करण्यात आले, तर अमेरिकन जिम्नॅस्ट सिमोन बायल्सने महिलांचा सर्वोच्च सन्मान पटकावला.
सर्वकालीन महान पोल व्हॉल्टर म्हणून ओळखल्या जाणारा 25 वर्षीय डुप्लांटिस गेल्या तीन वर्षांत प्रत्येक वेळा नामांकन झाल्यानंतर चौथ्यांदा हा पुरस्कार मिळविण्यात भाग्यवान ठरल्या. चारवेळचा विजेता उसेन बोल्टनंतर हा प्रतिष्ठित पुरस्कार जिंकणारा तो दुसरा ट्रॅक अँड फील्ड अॅथलीट ठरला आहे.
डुप्लांटिसने मार्चमध्ये दुसरे वर्ल्ड इनडोअर चॅम्पियनशिप सुवर्णपदक जिंकले आणि 2024 मध्ये पॅरिसमध्ये ऑलिंपिक सुवर्णपदक जिंकताना उल्लेखनीय नवव्यांदा स्वत:चाच विश्वविक्रम मोडला. या स्वीडिश-अमेरिकन खेळाडूने स्पेनचा कार्लोस अल्काराझ (टेनिस), फ्रान्सचा लिओन मार्चंद (जलतरण), स्लोव्हेनियाचा ताडेज पोगाकर (सायकलिंग) आणि नेदरलँड्सचा मॅक्स व्हर्स्टापेन (मोटर रेसिंग) यांच्यापेक्षा जास्त मते मिळवली.
विश्रांतीनंतर पुन्हा मैदानात उतरलेल्या बायल्सने पॅरिस ऑलिंपिकमध्ये शानदार पुनरागमन करताना तीन सुवर्ण आणि एक रौप्यपदक जिंकले होते. तिने चौथा लॉरेस पुरस्कार जिंकत सेरेना विल्यम्सच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. दोन्ही खेळाडूंना एक ‘कमबॅक ऑफ द इयर’ पुरस्कार देखील मिळालेला आहे. बायल्सने स्पेनची आयटाना बोनमॅटी (फुटबॉल), नेदरलँड्सची सिफान हसन (अॅथलेटिक्स), केनियाची फेथ किप्येगॉन (अॅथलेटिक्स), अमेरिकेची सिडनी मॅकलॉफ्लिन-लेव्ह्रोन (अॅथलेटिक्स) आणि बेलारूसची आर्यना साबालेन्का (टेनिस) यांना मागे टाकले. ब्राझिलियन जिम्नॅस्ट रेबेका आंद्रादला कारकिर्दीला धोकादायक असलेल्या दुखापतींमधून प्रेरणादायी पुनरागमनासाठी ‘कमबॅक ऑफ द इयर’ पुरस्कार मिळाला आहे.