डंपरची दुचाकीला धडक ; दाम्पत्य ठार
कोल्हापूर :
देवदर्शनावरून परतत असताना डंपरने दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार पत्नी सुनीता संजय वडिंगे (वय 50) या जागीच ठार झाल्या, तर पती संजय सदाशिव वडिंगे (वय 59, दोघेही रा. मंगळवार पेठ, वडिंगे गल्ली) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. येथील पंचगंगा नदी रस्त्यावरील यशोदा पूलानजीक सोमवारी सकाळी दहाच्या सुमारास हा अपघात घडला. या अपघाताची नोंद गावभाग पोलिसांत झाली आहे. याप्रकरणी डंपर चालक शब्बीर चांदसाहेब जर्मन (वय 37, रा. दत्तनगर गल्ली नंबर 5, शहापूर) याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला असून पोलिसानी त्याला अटक केली आहे.
याबाबत घटनास्थळावरून आणि पोलिसातून मिळालेली माहिती अशी, संजय वडिंगे हे गृहरक्षक दलाचे इचलकरंजी विभागाचे प्रभारी अधिकारी होते आणि 15 दिवसापूर्वीच सेवानिवृत्त झाले होते. ते दररोज सकाळी पंचगंगा नदीकिनारी असलेल्या वरदविनायक मंदिरात दर्शनासाठी जात असत. या मार्गावर रस्ता बांधणीचे काम सुरू असल्याने एकेरी वाहतूक सुरू आहे. यामुळे या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते. सोमवारी सकाळी पंचगंगा नदीमार्गे इचलकरंजीकडे येण्राया डंपरने वडिंगे यांच्या दुचाकीला मागून धडक दिल्याने दुचाकीस्वार दाम्पत्य रस्त्यावर कोसळले. यात पत्नी सुनीता यांच्या डोक्यावरुन डंपरचे चाक गेल्याने त्या जागीच ठार झाल्या. तर या अपघातामध्ये गंभीर जखमी झालेल्या संजय वडिंगे यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचार सुरू असताना त्यांचाही मृत्यू झाला. यामुळे मंगळवार पेठ परिसरात शोककळा पसरली आहे.
अपघातानंतर घटनास्थळी नातेवाईकांनी धाव घेतली आणि आक्रोश केला. अपघातामुळे यशोदा पूलाजवळ वाहतूक मोठ्या प्रमाणात ठप्प झाली होती. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. त्यानंतर वाहतूक सुरळीत केली. दरम्यान, अपघातातील डंपर गावभाग पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. तसेच डंपर चालक शब्बीर जर्मन याला पोलिसांनी अटक केली आहे. याबाबतची वर्दी मृतांचा मुलगा सुरज संजय वडिंगे यांनी गावभाग पोलिसांत दिली आहे.
वडींगे दांपत्याचा दोन महिन्यांपूर्वीही अपघात
दोन महिन्यांपूर्वी दुचाकी स्लिप झाल्याने संजय वडिंगे दाम्पत्याचा अपघात झाला होता. त्या अपघातात सुनिता वडिंगे या जखमी झाल्या होत्या. सोमवारी झालेल्या अपघातानंतर घटनास्थळी उपस्थित नातेवाईकांनी या पूर्वीच्या अपघाताची आठवण करून दिली. मात्र सोमवारचा दुचाकीवरील प्रवास त्यांच्यासाठी जीवघेणा ठरला.