For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

विठ्ठलभक्तीने दुमदुमला दिवे घाट

06:22 AM Jul 03, 2024 IST | Tarun Bharat Portal
विठ्ठलभक्तीने दुमदुमला दिवे घाट
Advertisement

 माउलींची पालखी सासवड मुक्कामी, तर तुकोबांची पालखी लोणी काळभोरमध्ये विसावली

Advertisement

पुणे / प्रतिनिधी

विठ्ठलभक्तीने भिजला दिवे घाट ।

Advertisement

जाहली सोपी वाट ।। पंढरीची ।।

विणेचा झंकार...टाळ मृदंगाचा गजर...अन् विठुनामाच्या बळावर दिवेघाटाचा अवघड टप्पा संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याने मंगळवारी लिलया पार केला अन् माउलींची पालखी संत सोपानदेवांच्या सासवडनगरीत विसावली. पुणेकरांच्या आदरातिथ्याने भारावलेला संत ज्ञानेश्वर माउली व जगद्गुरू तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा सकाळी मार्गस्थ झाला. हडपसरमार्गे तुकोबांची पालखी लोणी काळभोरच्या दिशेने वळाली. तर माउलींची पालखी सासवडच्या दिशेने निघाली. आळंदी ते पंढरपूर या मार्गावरचे आळंदी ते पुणे हे अंतर 21 किमी, तर पुणे ते सासवड हे अंतर 28 किमीचे आहे. सासवडचा टप्पा हा सर्वांत मोठा व अवघड मानला जातो. या मार्गावरील दिवेघाट हा पालखी सोहळ्याची परीक्षा पाहणारा असतो. दुपारी वडकीमार्गे पालखी सोहळा घाटाच्या पायथ्यापाशी आला. भला थोरला दिवे घाटही जणू स्वागतासाठी उभा ठाकलेला. दिवे घाट पाहताच वारकऱ्यांचा उत्साह वाढला. विठूनामाच्या छंदात वारकरी घाट चढू लागले. तोवर वातावरण भारलेले. हिरवा शालू ल्यालेल्या दिवे घाटात निसर्गाची मुक्त उधळण सुरू होती. धुक्याची हलकीशी चादर, अधूनमधून कोसळणाऱ्या पावसाच्या सरी नि तुकोबा-माउलींचा जयघोष याने सोहळा भक्तिरसात चिंब भिजला. त्यानंतर घाटाची अवघड चढण पार करीत माउलींची पालखी सायंकाळी सासवड मुक्कामी दाखल झाली. तेथे भाविकांची दर्शनासाठी एकच झुंबड उडाली. पालखीतील माउलींच्या पादुकांवर माथा टेकवण्यासाठी सासवड व परिसरातील भाविक मोठ्या संख्येने एकवटले. ज्येष्ठ नागरिक, स्त्रिया, मुले अशी सर्वांचीच गर्दी पहायला मिळत होती. सबंध परिसर पालखीच्या तेजाने उजळून गेला होता. दिंड्यादिंड्यांमध्ये विठूनामाचा गजर होत होता. ज्ञानोबा माउली तुकाराम...ज्ञानोबा तुकाराम...च्या स्वरांनी अवघे वातावरण भारलेले. यारे नाचू प्रेमानंदे । विठ्ठल नामाचिया छंदे ।। असा भाव प्रत्येकाच्या मनावर उमटला होता.

 तुकोबांची पालखी लोणी काळभोर मुक्कामी

दरम्यान, संत तुकोबांची पालखी टाळ मृदंगाच्या गजरात व विठूनामाच्या घोषात लोणी काळभोर मुक्कामी दाखल झाली.

Advertisement
Tags :

.