Solapur : 'या' कारणामुळे झेडपी, महापालिका निवडणुका स्वबळावरच : मंत्री दत्तात्रय भरणे
सोलापुरात राष्ट्रवादीची कार्यकर्त्यांसोबत रणनीती बैठक
सोलापूर : आगामी महापालिका निवडणुकीत सर्व १०२ जागा लढविण्याचा आग्रह राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्याकडून होत आहे. त्यामुळे आमागी निवडणूक कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेत स्वबळावर लढविण्यात येतील. मात्र याबाबत अंतिम निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार घेतील, अशी माहिती राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सोलापुरात दिली.
कृषीमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्ह्याचे संपर्कमंत्री भरणे यांनी मंगळवारी सोलापूर जिल्ह्याचा दौरा केला. यावेळी त्यांनी सकाळी माजी आमदार संजय शिंदे यांच्या फॉर्महाऊसवर ग्रामीण राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकारी यांच्यासमवेत बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी सायंकाळी सोलापुरातील शासकीय शहर अतिथीगृहात सोलापूर राष्ट्रवादीची बैठक घेतली.
या बैठकीनंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी जिल्हाध्यक्ष उमेश पाटील, शहराध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान आदी उपस्थित होते. रा राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मोहोळचे माजी आमदार राजन पाटील, माजी आमदार यशवंत माने, सांगोल्याचे माजी आमदार दीपक साळुंखे व माढ्याचे माजी आमदार बबन शिंदे यांचे गट भाजपमध्ये पालकमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.
संदर्भात या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांची भेटही घेतली होती. मी केवळ संवादासाठी आलो आहे. डॅमेज कंट्रोलसाठी नाही, असा खुलासा भरणे यांनी यावेळी केला. राष्ट्रवादी अजित पवार गटात देखील अनेक इच्छुकांची रांग लागली असून योग्य वेळी त्यांना प्रवेश देऊ असे सांगितले. अजित पवारांचे सोलापूर जिल्ह्यावर खूप प्रेम असून जिल्ह्यातील नेतेही दादांवर प्रेम करतात. त्यामुळे कोणीही सोडून जाणार नाही, असा विश्वास देखील दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केला.