पावसामुळे नरकासूरांची दैना, क्रीडानगरीत चिखलकाला
अवेळी पावसाने रात्री राज्याला झोडपले : वृक्ष कोसळले, वीज खंडीत, जनजीवन विस्कळीत
पणजी : अवेळी बरसलेल्या जोरदार पावसाने बुधवारी राज्याला झोडपून काढले. त्यामुळे राज्यातील जनजीवन विस्कळीत झाले. पहाटे 4.30 च्या दरम्यान गडगडाटासह अचानक सुरू झालेला हा पाऊस दोन ते अडीच तास कोसळला. हवामान खात्याने त्याची नोंद अडीच इंच एवढी केली आहे. गावोगावी आणि वाड्यावाड्यावर तयार होत असलेल्या नरकासूर प्रतीमांची पार दैना झाली. रात्री जागवून घेतलेल्या श्रमांवर अचानक पाणी फेरल्यामुळे तऊणाई हिरमुसली झाली. 37 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांसाठी पणजीत उभारण्यात आलेल्या क्रीडा नगरीमध्ये अक्षरश: ‘चिखलकाला’ झाला. अरबी समुद्रात इशान्येकडील भागात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे हा पाऊस कोसळला असून त्याचा जोर थेट कोकण किनारी भागापर्यंत होता. हे क्षेत्र आता पश्चिम दिशेला सरकत असल्याने हळुहळू पाऊस कमी होणार असला तरी आज व उद्याही राज्यात पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. पणजीसह ओल्ड गोवा, म्हापसा, पेडणे, केपे, सांगे, फोंडा, काणकोण, दाबोळी आदी भागातही मुसळधार पाऊस झाला. वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी विजेचे खांब पडल्यामुळे वीज पुरवठा खंडीत होण्याच्या घटना घडल्या. हरमल, पेडणे, शिवोली, निरंकाल आदी भागात वृक्ष उन्मळून पडल्याचे वृत्त आहे. कारापूर सांखळी येथे एका लॉन्ड्रीच्या आवारात वीज कोसळल्याची माहिती प्राप्त झाली आहे. मात्र कुठेही जीवितहानी झाल्याची नोंद झालेली नाही.
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेवर परिणाम
राज्यात सुरू असलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांवरही या पावसाचा बराच परिणाम झाला. कांपाल, मिरामार, फातोर्डा, पेडे या क्रीडा प्रकल्पात पाणी साचल्याने सर्वत्र चिखलमल परिस्थिती निर्माण झाली. त्याची साफसफाई करताना सर्वांची तारांबळ उडाली. तेथे उभारण्यात आलेल्या स्वयंपाक तंबूमध्ये प्रचंड प्रमाणात पाणी भरल्याने शेवटी तेथील साहित्य अन्यत्र हलविण्यात आले. या स्पर्धेसाठी आणण्यात आलेले क्रीडा साहित्य, जनरेटर्स हे सर्वकाही भिजून गेले. त्यामुळे अनेक स्पर्धांच्या वेळापत्रकात बदल करावे लागले. तरीही तातडीने पर्यायी व्यवस्था करून स्पर्धा सुरू करण्यात आल्या.
सकाळी पणजीत वाहतूक कोंडी
राजधानीत शहरातील अनेक भागासह मळा परिसरातील रस्ते जलमय झाले. स्मार्ट सिटीच्या कामांसाठी खोदलेले रस्ते आणि त्यातील ख•s पाण्याने भरल्यामुळे लोकांचे आणि वाहनचालकांचेही बरेच हाल झाले. शहरात दिवसभर वाहतूक कोंडीचे प्रकार दिसून आले. या पावसामुळे जनसामान्यांप्रमाणेच अग्निशामक दल आणि वीज खात्याच्या कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढला. खंडीत वीज पुरवठ्यामुळे वीज कर्मचाऱ्यांना रात्रीपासून धावपळ करावी लागली तर झाडे उन्मळून पडल्याने अग्निशामक दलाच्या जवानांना ती झाडे हटवून रस्ते वाहतुकीसाठी सुरळीत करताना अपार कष्ट घ्यावे लागले. दरम्यान, हवामान खात्याने आज आणि उद्या राज्यात यलो अलर्ट जारी केला आहे.
राज्यभरात कोसळलेला पाऊस (इंचमध्ये)
- पणजी - 4
- जुने गोवे - 2
- म्हापसा - 2
- पेडणे - 1
- सांखळी - 1.6
- फोंडा - 1.4
- मडगाव - 4
- दाबोळी - 4
- सांगे - 2
- केपे - 2
- कोणकोण - 1