मोदी सरकारच्या प्रयत्नामुळे अयोध्येत राम मंदिर पूर्णत्वाला
कारवारचे खासदार अनंतकुमार हेगडे यांचे पत्रकार परिषदेत प्रतिपादन : राज्यात पुन्हा एकदा भाजपचे सरकार येणार असल्याचा केला दावा
कारवार : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या प्रयत्नामुळे अयोध्येत राम मंदिर पूर्णत्वाला गेले आहे. अयोध्येतील राम मंदिराची उभारणी म्हणजे हिंदू राष्ट्र निर्मितीच्या दिशेने टाकलेले पहिले पाऊल आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना हिम्मत असेल तर त्यांनी हिंदू राष्ट्र निर्मिती रोखून दाखवावी, असे आवाहन कारवारचे खासदार आणि माजी मंत्री अनंतकुमार हेगडे यांनी केले. गेल्या सुमारे तीन वर्षांनंतर रविवारी शिरसी येथील आपल्या निवासस्थानी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. हेगडे पुढे म्हणाले, सिद्धरामय्या हे अहंकारी मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे कर्नाटकात काँग्रेस सरकार अधिक काळ टिकणार नाही. लोकसभा निवडणुकीनंतर देशात पुन्हा भाजपच्या नेतृत्वाखालील सरकार अस्तित्त्वात येणार आहे. याशिवाय कर्नाटकात पुन्हा एकदा भाजपचे सरकार येणार आहे, असा विश्वास व्यक्त करून हेगडे पुढे म्हणाले, काँग्रेस अल्पसंख्याकाचे राजकारण करते. या पक्षाने कधीही बहुसंख्याकाचे राजकारण केलेले नाही. हिजाब प्रकरणी सिद्धरामय्या यांनी घेतलेली भूमिका योग्य नाही. कोणीही, कुठल्याही प्रकारचे ड्रेस परिधान ही जी काय भूमिका सिद्धरामय्या यांनी घेतली आहे, त्याचे भविष्यात भयानक परिणाम होणार आहेत. अल्पसंख्याकानी जर का हिजाबचा वापर केला तर आम्हीही केसरी शाल वापरण्यास मागे-पुढे पाहणार नाही. टीपू सुलतानने कर्नाटकातील जनतेला सांस्कृतिक आणि सामाजिक दृष्ट्या फार त्रास दिला आहे. त्यामुळे टीपू सुलतानला कर्नाटक जनेतच्या हृदयात स्थान नाही. तरी सुद्धा काँग्रेस टीपू सुलतान आणि हिजाबच्या नावाने राजकारण करीत आहे.
सिद्धरामय्या यांच्यावर टीका
सिद्धरामय्या यांच्या गॅरंटी योजनांवर हल्ला चढवून हेगडे पुढे म्हणाले, जनतेला या योजना नको होत्या, तरीसुद्धा सिद्धरामय्या सरकारने या योजना जनतेवर लादून विकास कार्याचा खेळखंडोबा केला आहे, असे सांगून गॅरंटी योजनावर पैशांची उधळण करुन कर्ज उभारण्याच्या सिद्धरामय्या यांच्या कारभारावर त्यांनी टीका केली.
वैयक्तिक कारणामुळे दूर
आरोग्य आणि वैयक्तिक कारणामुळे आपण गेल्या काही महिन्यांपासून निवडणूक आणि पक्षीय राजकारणापासून दूर राहिलो होतो. निवडणूक राजकारणात रस नसल्याचे आपण यापूर्वीच स्पष्ट केले आहे. तरीसुद्धा कार्यकर्त्यांच्या दबावामुळे, प्रेमापाटी आणि बदलत्या राजकीय प्रवाहाची दखल घेण्याची वेळ येऊन ठेपली, असे त्यांनी पुढे स्पष्ट केले.