पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या समर्थ नेतृत्वामुळे देशाची आर्थिक महासत्ताकडे वेगाने वाटचाल
भाजपचे लोकसभा उमेदवार विश्वेश्वर हेगडे-कागेरी यांच्याकडून हल्याळ येथे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन
वार्ताहर /हल्याळ-जोयडा
विद्यमान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या समर्थ नेतृत्वाखाली भारत देश आर्थिक महासत्ताकडे वेगाने वाटचाल करत असून भारताचे स्थान जागतिक स्तरावर सन्मानाने घेतले जात आहे. भारतात सर्वच राज्यात केंद्राकडून मोठ्या प्रमाणात विकासकामे राबविली जात आहेत. पुढील लोकसभेत भाजपची सत्ता येणार आहे. यासाठी कॅनरा लोकसभेच्या मतदारांनी पूर्वीप्रमाणेच भाजपला निवडून द्यावे, यासाठी भाजप कार्यकर्त्यांनी बूथस्तरावर प्रभावीपणे काम करावे, असे माजी सभापती व भाजपचे लोकसभा उमेदवार विश्वेश्वर हेगडे- कागेरी यांनी हल्याळ येथे भाजप कार्यकर्त्यांच्या पूर्वसिद्धता सभेत केले. हल्याळ येथे ही सभा सुरू होण्यापूर्वी हल्याळ येथील शिवाजी सर्कल येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार घातल्यानंतर गणेश मंडप येथे आयोजित सभेत ते बोलत होते. विश्वेश्वर हेगडे-कागेरी पुढे म्हणाले, सर्वसामान्य जनतेला गेल्या पाच वर्षात केंद्राच्या अनेक योजनांचा लाभ झालेला आहे. खास करून गरिबांना मोफत रेशन, आयुष्मान योजना, प्रधानमंत्री आवास योजना याचा लाभ जनतेपर्यंत प्रभावीपणे राबविण्यात आले आहे. यामुळे सर्वसामान्यांना इतर आणखीन नवीन योजना लागू होणार आहेत, असे आश्वासन दिले.
सत्तेवर येताच कर्नाटकाला लाभ
भाजप पक्षाच्या राज्य उपाध्यक्षा व माजी आमदार रूपाली नाईक म्हणाल्या, भाजप पक्ष हा सर्व जाती-धर्माच्या नागरिकांना समान वागणूक, सुरक्षितता व केंद्राच्या योजना सर्वांनाच समप्रमाणात दिल्याने इतर अल्पसंख्याक जनतेचा भाजपवर विश्वास वाढलेला आहे. काँग्रेस पक्ष हा अल्पसंख्याक जनतेत भीतीचे वातावरण निर्माण करत आहे. तरी अल्पसंख्याक जनतेला सत्य समजल्याने भाजपला उघड समर्थन देत आहे. भाजप सत्तेवर येणारच आहे. याचा मोठा लाभ कर्नाटकातील आणखीन विकासकामे राबविण्यात मदत होणार आहे, असे सांगितले. व्यासपीठावर माजी आमदार सुनील हेगडे, माजी एमएलसी एस.एल.घोटणेकर व भाजप पदाधिकारी उपस्थित होते. माजी आमदार सुनील हेगडे व माजी एमएलसी एल.एल. घोटणेकर यांनी काँग्रेस पक्षावर व नेत्यांवर जोरदार टीका केली.