प्राणायाममुळे साधकाची विषयांची ओढ कमी होते
अध्याय तिसरा
बाप्पा म्हणाले, काही साधक निरनिराळ्या साधनांनी माझे यजन करत असतात. त्यापैकी काही सतत माझे ध्यान करून समाधीअवस्था साधून माझे रूप होतात. ते माझ्याबरोबर स्वानंदलोकात राहतात. काही योगी प्राण आणि अपान ह्यांची गती रोधून यज्ञ करतात. जे प्राण आणि अपान ह्या वायूंची गती रोधून प्राणवायूचा अपानवायुत आणि अपानवायूचा प्राणवायुत होम करतात. ते प्राणायामपरायण योगी होतात असं बाप्पा आपण सध्या अभ्यासत असलेल्या प्राणे पानं तथा प्राणमपाने प्रक्षिपन्ति ये। रुद्ध्वा गतीश्चोभयोस्ते प्राणायामपरायणा ।।35।। ह्या श्लोकात सांगत आहेत.
भगवान पतंजलीनी पातंजल योगदर्शनामध्ये प्राणायामबद्दल सविस्तर माहिती दिली आहे. ते म्हणतात, प्राणायामच्या माध्यमातून नैसर्गिकरीत्या चालू असलेल्या आपल्या श्वसन क्रियेवर ताबा मिळवता येतो. रेचकामध्ये फुफ्फुसातील वायू संथपणे आणि पूर्णतया बाहेर सोडायचा असतो. पुरकात बाहेरील प्राणवायू आत घ्यायचा असतो. फुफ्फुसात असलेला वायू बाहेरही सोडायचा नाही आणि बाहेरील वायू आतही घ्यायचा नाही याला कुंभक प्राणायाम असे म्हणतात. प्राणायाम अगदी सहजपणे करायचा असून तो करत असताना तज्ञ मार्गदर्शकाची मदत जरूर घ्यावी. प्राणायामचा प्राथमिक अभ्यास योगाभ्यासी साधकाच्या दृष्टीने पुरेसा आहे कारण त्याला त्यातून काही इतर कार्य सिद्धी करायची नसून चित्तशुद्धी झाली की त्याचे काम भागते. आवश्यक तेव्हढा प्राणायामचा अभ्यास करून साधकाने ध्यान, धारणा, समाधी ह्यांच्या अभ्यासाला लागावे असे मुनींचे मनोगत आहे.
प्राणायामचा अभ्यास आवश्यक तेव्हढा झाला म्हणजे प्राणवृत्तीला स्थिरपणा येऊ लागतो. ती तशी व्हावी हेच प्राणायामचे उद्दिष्ट असते. त्यामुळे मनाचे चांचल्य मोडून मन एकाग्र होण्यास मदत होते. पुढील प्रत्याहारादि अंगांची नीट अमंलबजावणी होण्यासाठी प्राणायामचा अभ्यास योगशास्त्राने सांगितला आहे. प्राणायामचा पुरेसा अभ्यास झाला म्हणजे पूरक, कुंभक, रेचक या क्रिया आपल्या नकळत, शरीराला लागलेल्या श्वासोच्छवास करायच्या विशिष्ठ सवयीमुळे आपोआप घडत राहतात. परिणामी श्वास सूक्ष्मपणे चालू असतो. आवश्यक तेव्हढा प्राणायामचा अभ्यास घडू लागला की साधकाची मिनिटाला पंधरा वेळा श्वासोच्छ्वास करायची नैसर्गिक गती मागे पडून त्याच्या शरीराला अनुकूल अशी नवी श्वासाची गती त्याला प्राप्त होते आणि हळूहळू त्या गतीने श्वासोच्छवास करायची सवय त्याला आपोआपच लागते. थोडक्यात त्याच्या योगाभ्यासास अनुकूल अशी श्वास घेण्याची व सोडण्याची गती त्याच्या सवयीची होते आणि त्याच्या योगाभ्यासास ती पूरक ठरते. पूरक म्हणजे किती? तर त्यामुळे त्याची चित्तवृत्ती स्थिर होऊन तो निर्विकल्प समाधीचा अनुभव सतत घेऊ शकतो.
श्वासोच्छवास करण्याच्या या नव्या गतीला योगशास्त्रात केवल कुंभक असे नाव आहे. त्यामुळे प्राणवृत्ती केव्हाही स्तंभित होऊ लागते आणि मन त्या क्षणापुरते वृत्तीशुन्य होते. प्राणवृत्ती स्तंभित होणे, स्थिर होणे हेच कुंभकातून साधावयाचे असते. यातून निर्विकल्प समाधी क्षणभर का होईना साधली जात असते. प्राणायामचे होणारे फायदे सांगताना मुनी म्हणाले, प्राणायाममुळे चित्तातील प्रकाशावर म्हणजे सत्वगुणावर रज आणि तम गुणाचे असलेले पांघरूण काढले जाते. प्राण निग्रहाने इंद्रियांचे सर्व दोष जळून जातात. त्यामुळे रज, तम गुणांमुळे होणाऱ्या वासना निर्बल होत जातात. ह्याप्रमाणे वासनांचे आवरण विरळ झाल्याने चित्तातील सत्वगुणाच्या ठिकाणी असलेला प्रकाशकता हा गुण अधिकाधिक स्पष्ट होऊ लागतो. ह्यामुळे आपोआपच साधकाची विषयांची ओढ कमी होते.
क्रमश: