For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

प्लास्टिक कचऱ्यामुळे उडाली साऱ्यांचीच तारांबळ

11:31 AM Jul 25, 2024 IST | Tarun Bharat Portal
प्लास्टिक कचऱ्यामुळे उडाली साऱ्यांचीच तारांबळ
Advertisement

शिवाजी रोडवरील लेंडी नाल्यात कचरा अडकल्याने समस्या : रात्री उशिरापर्यंत मनपाचे कर्मचारी नालासफाई कामावर

Advertisement

बेळगाव : प्लास्टिक बॉटल, पिशव्या तसेच इतर साहित्य वापरून ते गटारीत फेकून दिले जाते. मात्र, जोरदार पावसामुळे हेच प्लास्टिकचे साहित्य साऱ्यांचीच डोकेदुखी ठरत आहे. बुधवारी जोरदार पावसामुळे शहरातील सांडपाणी व गटारींचे पाणी वाहून नेणारा लेंडीनाला, अंबा भुवनजवळील पुलाजवळ ब्लॉक झाल्याने एकच गोंधळ उडाला. यासाठी महानगरपालिकेला मोठी कसरत करावी लागली. तब्बल दोन तास यासाठी नगरसेवकांसह अधिकाऱ्यांना धावपळ करावी लागली.

जोरदार पावसामुळे शहरातील विविध भागातून आलेला हा कचरा शिवाजी रोड, तसेच अंबा भुवनजवळील पुलाच्या खालीच अडकून बसला. त्यामुळे पाण्याचा निचरा होणे अशक्य झाले. परिणामी कोनवाळ गल्ली येथे नाला तुडुंब भरून त्याचे पाणी बाहेर पडण्याची भीती निर्माण झाली होती. आता नेमके करायचे काय? असा प्रश्न पडला. नाल्यातील कचरा पाहून सारेच अवाक् झाले. प्लास्टिक बॉटल, प्लास्टिक पिशव्या व इतर कचरा मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी साचून होता.

Advertisement

नाल्यात मोठ्या प्रमाणात कचरा असल्याची माहिती नगरसेविका वैशाली भातकांडे, जयतीर्थ सवदत्ती, सिद्धार्थ भातकांडे यांना समजली. त्यांनी याची माहिती महानगरपालिकेला दिली. महानगरपलिकेचे कर्मचारी दाखल झाले. मात्र जेसीबी नसल्याने समस्या निर्माण झाली. मनपाच्या मुख्य अभियंत्या लक्ष्मी निपाणीकर यादेखील दाखल झाल्या.यानंतर त्यांनी तातडीने जेसीबी मागवून कचरा काढण्याचा प्रयत्न केला. रात्री उशिरापर्यंत हे काम सुरू होते.

Advertisement
Tags :

.