कळसा-भांडुरामुळे पाण्याचे स्रोतच नष्ट
उत्तर कर्नाटकाचे होणार वाळवंट, सर्वात मोठा धोका कर्नाटकालाच बसण्याची शक्यता
बेळगाव : पर्यावरणाचा ऱ्हास होत राहिल्यास पाण्याचे स्रोत नष्ट होतील. कळसा-भांडुरा प्रकल्पामुळे लाखो झाडांची कत्तल होणार आहे. परिणामी पर्यावरणाचा ऱ्हास होऊन पाण्याचे स्रोत कमी होऊन भविष्यामध्ये कर्नाटकालाच मोठा फटका बसणार आहे. कोणत्याही राजकीय हेतूने आमचा विरोध नाही. परंतु पर्यावरणाच्या ऱ्हासाला आमचा नेहमी विरोध आहे. कर्नाटकाने आपल्या भवितव्याचा विचार करावा, तसेच प्रत्येकाने कळसा-भांडुरा प्रकल्पाचा अभ्यास करावा, असे आवाहन कॅप्टन नितीन धोंड यांनी केले.
कन्नड साहित्य भवन येथे कळसा-भांडुरा प्रकल्प राबविण्याबाबत चर्चासत्राचे आयोजन केले होते. त्यावेळी त्यांनी वरील धोका स्पष्ट केला आहे. पाणी साऱ्यांनाच हवे. मात्र, त्या पाण्यासाठी पाण्याच्या उत्पत्तीचा स्रोतच बंद झाला तर ते पाणी किती दिवस मिळणार? कळसा-भांडुरा या प्रकल्पामुळे तीन लाख झाडांची कत्तल होणार आहे. अनेक दरी, उंच डोंगर नष्ट होणार आहेत. त्यामुळे हा धोका भविष्यात निर्माण होणार आहे. म्हादई नदीचे पाणी अडवून कळसा-भांडुराचे पाणी धारवाडला नेण्याचा प्रयत्न सुरू आहे. तो मुळात अत्यंत चुकीचा आहे. रेणुकासागर येथे जो डॅम होणार आहे, त्या डॅममध्ये किती वर्षे पाणी टिकणार आहे? धारवाड, हुबळी, नवलगुंद या परिसराला पाणी मिळत असले तरी उत्तर कर्नाटकचे मात्र वाळवंट होणार आहे. बेळगाव जिल्ह्याचे वाळवंट झाले तर त्यांना पाणी मिळणार का? याचादेखील या ठिकाणी अभ्यास करायला हवा, असे ते म्हणाले.
बेळगाव जिल्ह्यात सर्वात जास्त पाऊस हा खानापूर तालुक्यात होत असतो. यामागील मुख्य कारण म्हणजे येथील अभयारण्य. या अभयारण्यामुळेच 1200 मि.मी. पेक्षाही अधिक पाऊस होत असतो. मात्र, जर कळसा-भांडुरा प्रकल्प झाला तर खानापूर तालुक्यात पाऊसच पडणार नाही, हे निश्चित आहे. याबाबत आमचा कोणताही राजकीय हेतू नाही. मात्र, झाडांमुळेच पाऊस होतो, हे साऱ्यांनाच माहीत आहे. निसर्गाचे रक्षण झाले तरच सर्व ऋतू वेळेत कार्यान्वित होतील. मात्र, जर निसर्गाचे आम्ही नुकसान केले तर ऋतूंमध्ये बदल होणार आहे. त्यामुळे ही सर्वात मोठी धोक्याची घंटा आहे, याकडे दिलीप कामत यांनी लक्ष वेधले.
कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोव्याचे अभयारण्य या प्रकल्पामुळे नष्ट होणार आहे. त्यामुळे तिन्ही राज्यांना त्याचा फटका आहे. सर्वात जास्त फटका हा कर्नाटकालाच बसणार, हे निश्चित आहे. त्यासाठीच कर्नाटकातील पर्यावरणप्रेमींनी अभयारण्य बचाव आंदोलन सुरू केले आहे. भविष्यामध्ये कर्नाटकाला धोका बसू नये, यासाठी आता सरकारनेच विचार करण्याची वेळ आली आहे. नाहीतर एक दिवस कर्नाटकही राजस्थानमधील वाळवंट बनू शकते. उसासाठी शेतकरी मोठ्या प्रमाणात पाण्याचा वापर करत असतात. मात्र, या पिकामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याचा साठा कमी होत चालला आहे. एकूणच सारासार विचार करण्याची वेळ आली आहे, असे पर्यावरणप्रेमी कॅ. नितीन धोंड, दिलीप कामत, डॉ. शिवाजी कागणीकर, गीता साहू, शारदा गोपाळ, सुवर्णा कोठाळी, नायला कोयलो यांनी स्पष्ट केले.