वाढत्या वाहतूक कोंडीमुळे रुग्णवाहिकेलाही मिळेना वाट
बेळगाव : टिळकवाडी येथील तिसरे रेल्वेगेट उड्डाणपुलाचे काम सुरू असल्यामुळे काँग्रेस रोडवरील वाहतुकीचा भार वाढला आहे. त्यामुळे रुग्णवाहिकाही या कोंडीमध्ये अडकून पडत आहे. एखादा अत्यवस्थ रुग्ण असेल तर त्याला रुग्णालयात पोहोचवण्यापूर्वीच जीव जाण्याची वेळ येत असल्याने वाढत्या कोंडीमुळे नाराजी व्यक्त केली जात आहे. रविवारी साप्ताहिक सुटी असल्याने खरेदीसाठी बाजारात गर्दी झाली होती. नोकरदारांनी साप्ताहिक सुटी दिवशी खरेदीसाठी हजेरी लावली होती. परंतु सायंकाळी 7 नंतर खरेदीदार पुन्हा घरी परतत असल्याने खानापूर रोड, काँग्रेस रोड याठिकाणी गर्दी झाली होती. या गर्दीमध्ये रुग्णवाहिका अडकून पडली. सायरन वाजवूनदेखील वाहतूक पुढे सरकत नसल्याने हतबल झालेल्या चालकाने रुग्णवाहिका तेथेच थांबवून ठेवली. असे प्रकार वारंवार घडत असल्यामुळे यातून मार्ग काढण्याची मागणी केली जात आहे.