अपुऱ्या व्यवस्थेमुळे मुर्डेश्वरात पार्किंग चक्क समुद्र किनाऱ्यावर
पर्यटकांतून नाराजी : पुरेशी पार्किंग व्यवस्था करण्याची मागणी
कारवार : जगप्रसिद्ध पर्यटनस्थळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कारवार जिल्ह्यातील मुर्डेश्वर येथे अपुऱ्या पार्किंग व्यवस्थेमुळे पर्यटकांची वाहने चक्क समुद्र किनाऱ्यावर पार्किंग करण्यात येत आहेत. त्यामुळे पर्यटकांतून नाराजी व्यक्त केली जात असून संबंधितांनी पुरेशी पार्किंग व्यवस्था करण्याची मागणी केली जात आहे. सध्या जिल्ह्यात पर्यटन हंगामाने जोर धरला आहे. त्यामुळे पृथ्वीवरील स्वर्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुर्डेश्वरात प्रत्येक दिवशी हजारो पर्यटक दाखल होत आहेत. शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या बरोबरीने अनेक पर्यटक मुर्डेश्वर येथे दाखल होत आहेत. यामध्ये उत्तर कर्नाटकातील पर्यटकांसह म्हैसूर, बेंगळूर, तुमकूर आदी दूरवरच्या शहरातील पर्यटकांचा समावेश आहे. ख्रिसमसची सुटी आणि चालू वर्षाला निरोप देऊन नव्या वर्षाचे स्वागत करण्याचा दिवस काही दिवसांवर येऊन ठेपल्याने येत्या काही दिवसात मुर्डेश्वर येथे पर्यटकांचा महापूर लोटणार आहे. मुर्डेश्वर येथे दाखल होणारे अधिकतर पर्यटक स्वत:च्या वेगवेगळ्dया वाहनातून येत असतात.
तथापि मुर्डेश्वर येथे पुरेशी पार्किंग व्यवस्था करण्यात आलेली नाही. त्यामुळे काही पर्यटक वाहनांचे पार्किंग चक्क समुद्र किनाऱ्यावर करावे लागत आहे. पार्किंगसाठी वाहन चालकांमध्ये लागलेली चढाओढ, वादविवाद नेहमीची बाब बनून राहिली आहे. समुद्र किनाऱ्यावर पार्किंग केल्याने किनाऱ्यावरील निसर्ग सौंदर्य धोक्यात येत आहे. पार्किंगमुळे समुद्र किनाऱ्याचा आनंद मनसोक्त लुटता येत नाही, अशी तक्रार पर्यटकांकडून केली जात आहे. किनाऱ्यावरील पार्किंगमुळे जलसाहस क्रीडामध्येही अडथळा निर्माण होत आहे. इतकेच नव्हे तर पार्किंग केलेल्या स्थळी समुद्राच्या लाटांनी झेप घेतली तर वाहने वाळूत रुतून बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे. आणि असे जर घडले तर पर्यटकांना मुर्डेश्वरचे पर्यटन आयुष्यभर स्मरणात राहणार आहे, अशा परिस्थितीत पर्यटनस्थळापासून योग्य ठिकाणी पार्किंग व्यवस्था होणे गरजेचे आहे. चोख पार्किंग व्यवस्था करण्याची जबाबदारी मुर्डेश्वर ग्राम पंचायत, पर्यटन खाते, पोलीस खाते, जिल्हा प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी स्वीकारावी, अशी मागणी केली जात आहे. अन्यथा पुरेशी पार्किंग व्यवस्था नाही म्हणून पर्यटक मुर्डेश्वरकडे पाठ फिरविण्याची शक्यता नाकारता येत नाही.