दुधगावात अलोट गर्दीत आक्रोश पदयात्रेचे जंगी स्वागत; खासगी कारखान्यांना मागणी मान्य, सहकाराचाच खोडा : शेट्टी
दुधगाव / वार्ताहर
जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील दुधगावात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक तथा माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखालील आक्रोश पदयात्रा अलोट गर्दीत संपन्न झाली. राजू शेट्टी यांचं गावात लहानाचे मोठे झाल्याने त्यांच्या स्वागतासाठी गावकरी उत्सुक होते. 37 साखर कारखान्यांनी गाळप केलेल्या तीन कोटी टन उसाचे प्रतिटन ४०० रुपये प्रमाणे १२०० कोटी रुपये वसुल करण्यासाठी निघालेली ही आक्रोश पदयात्रा रविवारी दुधगावात धडकली. या पदयात्रेचे शेतकरी बांधवांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहात जोरदार स्वागत केले.
यावेळी संदीप राजोबा,महेश खराडे,संजय बेले, भागवत जाधव,सरपंच करिष्मा पाखरे, उपसरपंच प्रविण कोले, सर्वोदय साखर कारखान्याचे संचालक भरत साजणे, उत्तर भाग सोसायटीचे संचालक सुभाष पाटील, मयूर पाटील, अमोल हेरवाडे,बाबा सांद्रे,शितल सांद्रे, सुनील कुदळे, नितीन उपाध्ये, अमोल कोले, दादासो पाटील, संदीप आडमुठे,कुंतीनाथ आवटी,अक्षय गुरव,बंडू कागवाडे, ग्रामपंचायत सदस्य माणिक कुंभार,फरिदा सुतार,सौ. सुरेखा मेहेत्रे,कमल साजणे,सुरेखा माळी, यांच्यासह महिला आणि शेतकरी बांधव, स्वाभिमानी संघटनेचे पश्चिम भागातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दुपारी दुधगाव येथील गणपती मंदिरापासून आक्रोश पदयात्रेस सुरुवात झाली. खणभाग, शासकीय दवाखाना, गावठाण मार्गे नवीन सावळवाडी रस्ता, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, कर्मवीर भाऊराव पाटील पुतळा, चावडी चौक,जैन मंदिर, दुधेश्वर या मार्गाने आक्रोश पदयात्रा निघाली. ठिकठिकाणी फुलांची उधळण करीत पदयात्रेचे स्वागत करण्यात आले. गावात अनेक ठिकाणी औक्षण करून महिला आणि ग्रामस्थांनी स्वागत केले. शांतीसागर ग्रुप आणि शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आक्रोश पदयात्रेत सहभागी झालेल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या भोजनाची व्यवस्था केली होती.
खासगी कारखान्यांना मागणी मान्य, सहकाराचाच खोडा : शेट्टी
सायंकाळी सहा वाजता खोचीच्या दिशेने पदयात्रा पुढील दौऱ्यासाठी मार्गस्थ झाली. या पदयात्रेला शेतकरी बांधव आणि ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी बोलताना माजी खासदार राजू शेट्टी म्हणाले, गत गळीत हंगामात तुटलेल्या ऊसाला प्रति टन 400 रुपये मिळावेत ही आमची मागणी असून ती रास्ता आहे. सोमेश्वर साखर कारखान्याने एफ आर पी पेक्षा ४६२ रुपये अधिक दर दिला आहे. खाजगी कारखानदारांना दर मान्य आहे. मात्र सहकार क्षेत्रात असलेल्या साखर कारखान्यांना हा दर मान्य का नाही. प्रति टन 400 रुपये मिळाल्याशिवाय उसाचे एक कांडकेही तोडू देणार नाही, असा इशाराही शेवटी त्यांनी दिला.
आक्रोश पदयात्रेचे उत्कृष्ट तसेच शिस्तबद्ध संयोजन पाहून माजी खासदार राजू शेट्टी यांनी उपसरपंच प्रवीण कोले आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे कौतुक केले. तसेच शाबासकीही दिली. मंगळवार दिनांक सात रोजी जयसिंगपूर येथे होणाऱ्या ऊस परिषदेसाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन शेट्टी यांनी केले.