For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बेळगाव-शिनोळी औद्योगिक वसाहत रस्ता दुपदरीकरण करा

10:25 AM Feb 15, 2024 IST | Tarun Bharat Portal
बेळगाव शिनोळी औद्योगिक वसाहत रस्ता दुपदरीकरण करा
Advertisement

वाहनधारकांसह नागरिकांतून मागणी : शासनाने लक्ष घालणे अत्यंत गरजेचे, अनेक ठिकाणी वाहतूक केंडी : अपघातांच्या प्रमाणात वाढ

Advertisement

वार्ताहर /उचगाव

कर्नाटक, महाराष्ट्र व गोवा या तीन राज्यांना जोडणाऱ्या बेळगाव-वेंगुर्ले मार्गावरील बेळगाव ते महाराष्ट्र हद्दीतील शिनोळी औद्योगिक वसाहतीपर्यंतच्या रस्त्याचे दुपदरीकरण करावे, वाहतुकीची होणारी कोंडी आणि सातत्याने होणाऱ्या अपघातातील प्राणहानी, वाहनांचे होणारे मोठे नुकसान थांबवावे, अशी मागणी प्रवासी व या भागातील असंख्य जनतेने बांधकाम खात्याकडे व शासनाकडे केली आहे. या रस्त्याच्या दुपदरीकरणाची मागणी गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबितच राहिली आहे. रोज हजारो वाहनांची या मार्गाने ये-जा होत असते. मात्र शासन याकडे कानाडोळा करत आहे. आतापर्यंत अनेकांना या रस्त्यावर आपले प्राण गमवावे लागले आहेत. असे असतानाही शासनाला अजून किती जणांचे बळी गेल्यानंतर या रस्त्याकडे लक्ष देणार, असा संतप्त सवाल जनतेतून केला जात आहे.

Advertisement

‘रस्त्याच्या दुतर्फा अतिक्रमणांचे जाळे’

बेळगाव ते शिनोळी औद्योगिक वसाहतीपर्यंतच्या 16 किलोमीटर अंतराच्या पट्ट्यात अनेकांनी रस्त्याच्या दुतर्फा अतिक्रमण केल्याचे दिसून येते. विजयनगर, सिंधी कॉलनी, हिंडलगा, सुळगा, तुरमुरी, बाची व शिनोळी आदी गावे रस्त्याच्या दुतर्फा वसलेली आहेत. येथील अनेक व्यावसायिकांनी आपले लहान-मोठे व्यवसाय रस्त्यालगतच थाटले आहेत. यामध्ये प्रामुख्याने मटण, चिकन दुकाने, उपाहारगृह, किराणी दुकाने, चहाची टपरी, पानाची दुकाने, रसवंतीगृह, फुले, नारळ, विव्रेते, भाजी विव्रेते, दुचाकी वाहन दुऊस्तीचे गॅरेज, असे अनेक व्यवसाय रस्त्याच्या दोन्ही बाजूला दिसून येतात. या दुकानांसमोर थांबणारी वाहने बऱ्याच वेळा रस्त्यावरच पार्क केल्याचे दिसून येते. मद्यविक्री दुकानांसमोर तर रांगांच्या रांगा लागलेल्या दिसतात. मात्र याचा सर्व त्रास रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या वाहनधारकांना होतो.

 ‘गणेश मंदिरांमधून भक्तांची गर्दी’

या मार्गावरील पट्ट्यात दोन गणेश मंदिरे व एक हनुमान मंदिर आहे. अरगन तलाव जवळील गणेश मंदिर आणि उचगाव मार्कंडेय तीर्थक्षेत्रावरील असलेले गणेश मंदिर या दोन्ही मंदिरांजवळ मंगळवार व शुक्रवार तसेच संकष्टी, विनायक जयंती अशावेळी दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांची गर्दी अधिक असते. अरगन तलावाजवळ वाहने पार्क करण्यासाठी पार्किंगची सोय करण्यात आली आहे. परंतू  पार्किंग रस्त्यापलीकडे असल्याने मंदिरात ये-जा करणाऱ्या भक्तांना रस्ता ओलांडून मंदिरात यावे लागते. त्यामुळे रस्ता ओलांडताना येथे वाहतुकीची कोंडी होते. रस्ता ऊंदीकरण झाल्यास येथील समस्या मिटणार आहे. उचगाव गणेशमंदिराजवळही अशीच परिस्थिती आहे.

‘बेळगाव - बाची रस्त्याचे दुपदरीकरण वगळले’

यापूर्वी रायचूर ते बाचीपर्यंतच्या रस्त्याचे दुपदरीकरण होणार होते. शासनाकडून याला मंजुरी मिळाली होती. मात्र रायचूर-बेळगाव या मार्गाचे केवळ दुपदरीकरण झाले. आणि बेळगाव-बाची या रस्त्याचे दुपदरीकरण रखडले आहे. या रस्त्याच्या मंजुरीचा निधी कुठे गडप झाला हे मात्र गुलदस्त्यात राहिले. यानंतर या संदर्भात आवाज उठवताच रस्त्याच्या ऊंदीकरणासाठी दोन वेळा मार्किंगचे नाटक केले. मात्र अद्याप रस्त्याचे ऊंदीकरण काही झाले नाही.

मंगल कार्यालयांमुळे वाहतूक कोंडी

या मार्गावर सिंधी कॉलनी, हिंडलगा, उचगाव, तुरमुरी अशा अनेक ठिकाणी मंगल कार्यालयांमध्ये लग्न समारंभ व इतर कार्यक्रम होत असल्याने प्रसंगी वाहतुकीची कोंडी होते. कार्यालयात सर्व मंडळी जाईपर्यंत ही गर्दी कायम असते. यावरही तोडगा काढण्यासाठी रस्ता ऊंदीकरण करण्याची गरज आहे. यामार्गे महाराष्ट्र व गोवा या दोन राज्यात प्रवाशांची वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असते. तसेच आंबोली हे पर्यटन क्षेत्र असल्याने या ठिकाणी बेळगाव शहराकडून सकाळी जाणाऱ्यांची गर्दी तर सायंकाळी परत येणाऱ्यांची गर्दी यामुळे रस्त्यावरती नेहमीच कोंडी होताना दिसते. यासाठी रस्त्याचे ऊंदीकरण हे अतिशय महत्त्वाचे आहे.

गतिरोधकांची नितांत गरज

बेळगाव-वेंगुर्ला या मार्गाच्या दुतर्फा अनेक गावांचा समावेश आहे. दुतर्फा नागरिकांची वस्ती, गावे असल्याने थेट रस्त्यावरूनच लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण रस्ता पार करण्याची धडपड करतात. आणि यामध्ये अनेकवेळा सातत्याने अपघात घडत आहे. यासाठी प्रत्येक गावात जोडरस्ते असून या ठिकाणी मोठे गतिरोधक घालणे आवश्यक आहे. तसेच पांढरे-पिवळे पट्टे मारणे अत्यावश्यक आहे.

Advertisement
Tags :

.