कोकण रेल्वे मार्गाचे दुपदरीकरण होणे ही काळाची गरज : झा
700 पैकी केवळ 50 किलोमीटरचे दुपदरीकरण : दुपदरीकरणाचा प्रस्ताव केंद्रीय मंत्रालयाकडे
मडगाव : कोकण रेल्वेचा प्रवास अधिक वेगवान होणे ही काळाची गरज आहे. प्रवास वेगवान होण्यासाठी दुपदरीकरण हाच पर्याय आहे. कोकण रेल्वे मार्गाच्या दुपदरीकरणाचा प्रस्ताव केंद्रीय रेल्वे मंत्रालयाला पाठविण्यात आला असून त्याला मान्यता मिळाल्यानंतरच दुपदरीकरणाचे काम पुढे जाणार असल्याची माहिती कोकण रेल्वेचे संचालक संतोष कुमार झा यांनी दिली. कोकण रेल्वे मार्गावरील रोहा ते वीर या 50 कि.मी. रेल्वे मार्गावरील दुपदरीकरण पूर्ण झाले आहे. त्यामुळे गाड्यांना थांबून ठेवण्याचे प्रमाण कमी झाले आहे. रोहा ते वीर या मार्गावरील कोंडी दूर होणार असल्याने प्रवासाची वेळही वाचू लागली आहे. या कामासाठी 530 कोटी ऊपये मंजूर करण्यात आले होते. कोकण रेल्वे मार्गावरील प्रवास वेगवान करण्यासाठी रोहा (महाराष्ट्र) ते ठोकूर (कर्नाटक) असे 700 किलोमीटर मार्गाचे दुपदरीकरण आणि विद्युतीकरण करण्याचा निर्णय कोकण रेल्वेने घेतला होता. त्यात विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले असून दुपदरीकरणाचे काम बाकी आहे. केंद्रीय रेल्वे मंत्रालयाकडून त्याला मान्यता मिळणे बाकी असल्याचे संतोष कुमार झा यांनी सांगितले.
मेगा ब्लॉक घ्यावेच लागणार
कोकण रेल्वे मार्गावर सध्या मेगा ब्लॉक घेतले जातात. त्यामुळे बऱ्याच गाड्या उशिराने धावतात. त्या संदर्भात बोलताना संतोष कुमार झा म्हणाले की, रेल्वे मार्गाची देखभाल करण्यासाठी मेगा ब्लॉक घेतले जातात. देखभाल महत्त्वाची असल्याने मेगा ब्लॉक घ्यावेच लागणार आहे. ज्या दिवशी मेगा ब्लॉक घेतले जातात. त्याची कल्पना अगोदरच प्रवाशांना देण्याचा प्रयत्न केला जात आहे. रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण करण्यात आलेले आहे. त्यामुळे रेल्वे मार्गाची देखभाल अत्यावश्यक बनलेली आहे. मेगा ब्लॉकमुळे काही रेलगाड्यांना विलंब होत आहे. हा विलंब दूर करणे केवळ दुपदरीकरणामुळे शक्य असले तरी कोकण रेल्वे मार्गाचे दुपदरीकरण झालेले नाही. त्यामुळे प्रवाशांना सहकार्य करावे लागणार असल्याचे मत त्यांनी मांडले. आगामी काळात मडगाव रेल्वे स्थानकाचा पूर्णपणे कायापालट केला जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.