डु प्लेसिस दिल्ली, पॉवेल कोलकाता, तर जॅनसेन पंजाब किंग्जकडे
वृत्तसंस्था/ जेद्दाह, सौदी अरेबिया
इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल) महालिलाव सोमवारी जेद्दाहमध्ये होऊन दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज खेळाडू फाफ डु प्लेसिसला दिल्ली कॅपिटल्सने, तर वेस्ट इंडिजचा पॉवर हिटर रोव्हमन पॉवेल याला कोलकाता नाइट रायडर्सने 1.5 कोटी रुपयांना करारबद्ध केले. चेन्नई सुपर किंग्ज आणि रायझिंग पुणे सुपरजायंट यांच्यासोबत खेळल्यानंतर 2022 पासून रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरचा कर्णधार म्हणून डु प्लेसिसने जबाबदारी पेलली होती.
धक्कादायक बाब म्हणजे न्यूझीलंडचे स्टार केन विल्यमसन आणि ग्लेन फिलिप्स यांना लिलावात कुणीही करारबद्ध केलेले नाही. तसेच भारतीय खेळाडूंपैकी मयंक अग्रवाल, अजिंक्य रहाणे आणि पृथ्वी शॉ यांच्यासाठीही कुणीच बोली लावली नाही. पंजाब किंग्जने दक्षिण आफ्रिकेचा हार्ड हिटिंग अष्टपैलू खेळाडू मार्को जॅनसेनला 7 कोटी रुपयांना करारबद्ध केले आहे. कृणाल पंड्याला रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरच्या रुपाने नवीन संघ मिळाला आहे. आरसीबीने पंड्याची सेवा 5.75 कोटींना मिळविताना राजस्थानला मागे टाकले. आश्चर्याची बाब म्हणजे शार्दुल ठाकूरसाठी मात्र कुणीच बोली लावली नाही. शार्दुल आयपीएल, 2024 मध्ये चेन्नईतर्फे खेळला होता.
वॉशिंग्टन सुंदर, जो सध्या ऑस्ट्रेलियात चालू असलेल्या भारताच्या बॉर्डर-गावसकर मालिकेत सहभागी आहे, त्याच्यासाठी सुरुवातीला कोणतीही बोली लागली नव्हती. पण आशिष नेहराने सल्लामसलत केल्यानंतर गुजरात टायटन्सने त्याच्यासाठी पहिली बोली लावण्याचा निर्णय घेतला. सुंदरसाठी नंतर लखनौ सुपर जायंट्सही पुढे सरसावला. मात्र गुजरातने त्याच्यासाठी लावलेली 3.2 कोटी रुपयांची बोली निर्णायक ठरली. न्यूझीलंडचा पॉवरहाऊस डॅरिल मिशेलचे कौशल्य सिद्ध झालेले असूनही त्याच्यासाठी कोणतीही बोली लावली नाही.
भुवनेश्वर कुमार आरसीबीकडे
पंड्याला गमावल्यानंतर राजस्थान रॉयल्सने आपले लक्ष नाईट रायडरचा माजी खेळाडू नितीश राणाकडे वळवले आणि 4.2 कोटी रुपयांची बोली लावत त्याच्याकडील करारावर शिक्कामोर्तब केले. वेस्ट इंडिजचा वनडे कर्णधार शाई होप हा या संचातील अंतिम खेळाडू होता आणि त्याला कुणीच करारबद्ध केले नाही. रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरने अनुभवी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारला 10.75 कोटी ऊ. इतकी मोठी रक्कम खर्च करून करारबद्ध केले आहे, तर दीपक चहर चेन्नईहून मुंबईच्या संघात स्थलांतरित झाला आहे. दीपकला मुंबईने 9.25 कोटींना करारबद्ध केले आहे.
गोलंदाज तुषार देशपांडेसाठीही या महालिलावात मोठी बोली लागली. त्याचा पूर्वीचा संघ सीएसके आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात जोरदार बोली युद्ध झाले. शेवटी राजस्थानने 6.50 कोटींची बोली लावून त्याला आपल्या बाजूने खेचले. तर गुजरात टायटन्सने गेराल्ड कोएत्झीला 2.4 कोटी रुपयांना झटपट उचलले. मुकेश कुमारसाठी पंजाबने 8 कोटींपर्यंत बोली वाढविली होती. पण दिल्ली कॅपिटल्सने राईट टू मॅच पर्याय वापरत त्याला राखले. लखनौने आपला मारा अधिक धारदार बनविताना आकाश दीपला 8 कोटींना, तर पंजाबने न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्युसनला 2 कोटींना करारबद्ध केले असून दक्षिण आफ्रिकेचा सलामीवीर रायन रिकल्टनला मुंबईने खेचले आहे.
अकील हुसेन (वेस्ट इंडिज), केशव महाराज (दक्षिण आफ्रिका), मुजीब उर रहमान (अफगाणिस्तान) आणि आदिल रशिद (इंग्लंड) यासह आंध्र प्रदेशचा यष्टीरक्षक-फलंदाज के. एस. भरतच्या वाट्याला कुणाचीच बोली आली नाही, तर ऑस्ट्रेलियन स्टार जोश इंग्लिसला पंजाब किंग्जने 2.6 कोटी रुपयांना करारबद्ध केल्याने तो ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस आणि माजी कर्णधार रिकी पाँटिंगला येऊन मिळाला आहे. तथापि, त्याचा सहकारी अॅलेक्स कॅरी, दक्षिण आफ्रिकेचा डॉन फेरेरा यांना कुणीच करारबद्ध केले नाही. अफगाणिस्तानचा युवा फिरकीपटू अल्लाह गझनफरला मुंबई इंडियन्सने 4.80 कोटी ऊपयांना उचलले आहे.